‘भीमसेन जोशी : सेलेब्रिटिंग हिज सेंटेनरी’ पुस्तकाद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना आदरांजली

पुणे  : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या वतीने ‘भीमसेन जोशी : सेलेब्रिटिंग हिज सेंटेनरी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

नुकत्याच दिल्ली येथील सूचना भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ धृपद गायक पद्मश्री उस्ताद वासिफुद्दिन डागर यांच्या हस्ते व सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमग्स्ट युथ अर्थात SPIC MACAY या संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. किरण सेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या संचालिका मोनीदिपा मुखर्जी, पुस्तकाच्या लेखिका डॉ. कस्तुरी पायगुडे-राणे या देखील यावेळी उपस्थित होत्या

२० व्या शतकातील संगीत क्षेत्रामधील भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तीमत्त्व, सादरकर्ते, गुरू आणि आयोजक म्हणून पं. भीमसेन जोशी यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या काळातील अतुलनीय सौंदर्याचा दृष्टीकोन असलेले संगीतकार, प्रबुद्ध व्यक्तीमत्त्व आणि नेहमीच कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेले कलाकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. २००८ साली भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले ते पहिलेच भारतीय शास्त्रीय गायक होते. भारतीय शास्त्रीय संगीतांच्या क्षेत्रात नाविन्य आणण्यामध्ये पं. भीमसेन जोशी यांचा मोलाचा वाटा होता. याच पं भीमसेन जोशी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘भीमसेन जोशी : सेलेब्रिटिंग हिज सेंटेनरी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात  आपल्या गुरुच्या शोधासाठी झालेला पं भीमसेन जोशी यांचा उत्तर भारतातील कठीण प्रवास, त्यानंतरचे संगीत प्रशिक्षण, संगीतकार म्हणून त्यांचे वेगळेपण याबरोबरच एक संगीतकार, एक गुरू, एक आयोजक म्हणून त्यांनी मागील सात दशके आपल्या विलक्षण क्षमतेने लोकांवर टाकलेल्या प्रभाव आदी बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

पुस्तकाच्या लेखिका डॉ. कस्तुरी पायगुडे राणे या पुणेस्थित भारतीय शास्त्रीय गायिका व शिक्षणतज्ज्ञ असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामधून त्यांनी आपले एम. ए व पीएच. डीचे शिक्षण पूर्ण केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सांस्कृतिक संसाधने व प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी) यांची कनिष्ठ फेलोशिप त्यांना प्राप्त असून भारताबरोबरच अमेरिका, ब्रिटन, युरोप यांसारख्या विविध ठिकाणी त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: