स्वरा भागवत, दत्ताहरी कदम, अश्विनी सोमण हे ‘गणेश गीत गायन स्पर्धा २०२१’ चे विजेते

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे गणेश गीत गायन स्पर्धा २०२१ या अनोख्या स्पर्धेत रत्नागिरीची स्वरा भागवत आणि पुण्याचे दत्ताहरी कदम, अश्विनी सोमण हे आपापल्या गटात प्रथम आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. श्री गणेश, त्याची रुपे आणि लिलांचे वर्णन करणारी आरती, भजन, अभंग, बालगीत, उत्सवगीत, स्तोत्र स्पर्धकांनी सादर केली.

गणपती सदन या मुख्य मंदिराच्या मागील ट्रस्टच्या इमारतीमध्ये पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी स्पर्धेच्या परीक्षक प्रख्यात गायिका शिल्पा पुणतांबेकर, संगीतकार आनंद कु-हेकर, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. एकूण १ लाख ५१ हजार रुपयांची पारितोषिके व स्मृतीचिन्ह विजेत्या स्पर्धकांना प्रदान करण्यात आली.

वयोगट ५ ते १५ मध्ये रत्नागिरीचे स्वरा भागवत (प्रथम), आंबेजोगाई बीडचा ॠत्विक कुलकर्णी (द्वितीय), पुण्याचा तनय नाझीरकर (तृतीय) आणि स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड अहमदनगरची रिद्धी कुलकर्णी व पुण्याची आनंदी जायदे हिला मिळाले. वयोगट १६ ते ४५ मध्ये पुण्याचे दत्ताहरी कदम (प्रथम), गायत्री येरगुड्डी (द्वितीय), सिंधुदुर्गचे नितीन धामापुरकर (तृतीय) आणि स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड पुण्याचे अमोल पटवर्धन यांना व उल्लेखनीय प्रस्तुती म्हणून नागपूरच्या सूरभी खेकाळे यांना पारितोषिक मिळाले.

वयोगट ४५ च्या पुढील मध्ये पुण्याच्या अश्विनी सोमण (प्रथम), मुंबईच्या प्रथिमा पै (द्वितीय), पुण्याच्या अनुराधा सोहोनी (तृतीय) आणि स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड अंजनगाव अमरावतीचे अरविंद देशपांडे यांना मिळाले. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, गौरी यादवाडकर, शिल्पा पुणतांबेकर आणि आनंद कु-हेकर यांनी परीक्षण केले होते. श्री गणेशाचे वर्णन करणारी नवी गीते समोर यावी आणि गणेशभक्तांना घरबसल्या गीतांद्वारे गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करावी हा स्पर्धेमागील उद्देश असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

शिल्पा पुणतांबेकर म्हणाल्या, पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये देखील संगीत क्षेत्रात अनेक चांगले गायक आहेत. गायनाची आवड असलेल्या वयवर्षे ५ ते १५ मधील मुलांना शास्त्रीय संगीत शिकवायला हवे. या वयात आवाजाला योग्य वळण लागेल. त्यामुळे सूरांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. मुलांचा कल ओळखून पालकांनी डोळसपणे मार्गदर्शन करायला हवे.

Leave a Reply

%d bloggers like this: