Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रार्थनास्थळे उघडणार आहोत, पण आरोग्यमंदिर देखील आवश्यक – मुख्यमंत्री

ठाणे:  कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने या काळात आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. प्रार्थनास्थळे उघडणार आहोत. त्याचबरोबरच आरोग्य मंदिरे देखील आवश्यक आहेत. ही आरोग्य मंदिरे उघडल्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

डोंबिवलीतील कोपर पुलाच्या लोकार्पणसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, रवींद्र फाटक, राहुल दामले, विकास म्हात्रे, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे ऑनलाइन उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे गेले दीड ते दोन वर्षाचा काळ कठीण होता. कोविड निर्बंधानंतर टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरू करत आहोत. कोविड काळात आपण आरोग्य सुविधा उभारण्यावर भर दिला आहे. ठाण्यातील सहायक आयुक्तांवर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या दुर्देवी घटनेनंतर अधिक कठोरतेने कायद्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले की, आपण जनतेचे सेवक म्हणून काम करत आहोत. या शहरांसाठी येथील जनतेसाठी रस्ते, पूल, रुग्णालय असे जे जे आवश्यक आहे, ते ते राज्य सरकारकडून दिले जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. येथील काही रस्त्यांची जबाबदारी केंद्र शासन घेणार असेल तर राज्य शासन त्याला सहकार्य करेल. केंद्र व राज्य मिळून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, कोविड काळात महानगरपालिकेने गतीने कामे केली आहेत. ही गती आणखी वाढवायला हवी. राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडे ठाणे जिल्ह्याचा एकत्रित प्रस्ताव पाठविल्यास त्यासाठी प्राधान्याने निधी देता येईल. भिवंडी- कल्याण मेट्रो आणि मुरबाड रेल्वेच्या कामासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.

पालकमंत्री शिंदे म्हणाले, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. कोविड विरुद्धच्या लढाईच्या कामांची दखल मा. पंतप्रधान व सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading