‘सेवा ग्लोबल ऑनलाईन गणेशोत्सव’ स्पर्धा व कार्यक्रमांची पर्वणी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शूरा मी वंदिले, घेऊ भरारी या कार्यक्रमांसह सुखकर्ता दु:खहर्ता आरती, गणेशगीत नृत्य, गणेश भक्तीगीत गायन, गोष्टी सांगा, सामाजिक संदेश फोटोग्राफी अशा विविध स्पर्धांनी सेवा ग्लोबल आॅनलाईन गणेशोत्सव साजरा होणार आहे. आॅनलाईन स्वरुपात केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांकरीता अनुभविता येतील असे कार्यक्रम शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला शिरीष मोहिते, वैभव वाघ, अमर लांडे, विक्रांत मोहिते आदी उपस्थित होते.
सेवा मित्र मंडळाचे यंदाचे ५६ वे वर्ष असून कोरोनाकाळात प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसले, तरी देखील उत्सवाचा आनंद आॅनलाईन स्वरूपात घरबसल्या घेता येणार आहे. हा उत्सव दिनांक १० ते २० सप्टेंबर पर्यंत होणार असून उत्सवाचे उद््घाटन दिनांक १० सप्टेंबर रोजी कर्नल ललित राय (निवृत्त), महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या हस्ते होणार आहे.

उत्सवादरम्यान पुणे ग्लोबल डिजिटल गणेशोत्सव स्पर्धेंतर्गत सुखकर्ता दु:खहर्ता आरती, गणेशगीत नृत्य ़(वैयक्तिक व सांघिक), गणेश भक्तीगीत गायन (वैयक्तिक व सांघिक), समाजसुधारक / क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगा, सामाजिक संदेश फोटोग्राफी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धकांनी ३ ते ५ मिनिटांर्पंताचा व्हिडीओ पाठवायचा आहे. स्पर्धेविषयी माहिती व व्हिडीओ पाठविण्यासाठी www.myspardha.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

दिनांक १० ते १८ दरम्यान दररोज सायं ५ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे शूरा मी वंदिले या कीर्तन महोत्सवात नेताजी सुभाषचंद्र बोस व सन १९६५, १९७१, कारगिल याविषयांवर कीर्तन होणार आहे. तर, स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी आयएएस व आयपीएस अधिका-यांचे आॅनलाईन मार्गदर्शनपर घेऊ भरारी हा कार्यक्रमा रात्री ८ वाजता आणि युवा व्याख्याते गणेश शिंदे यांच्या जीवन सुंदर आहे याविषयावरील व्याख्यानाचे रात्री १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. SevaMitraMandal या फेसबुक व यू टयूब पेजवरुन हे कार्यक्रम विनामूल्य गणेशभक्तांना पाहता येणार आहेत. तरी नागरिकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: