Sunday, September 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात आजपासून 10 सप्टेंबर सर्वदूर दमदार पावसाचा अंदाज

पुणे: गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने, पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिलासा मिळाला. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी 5ते 10 सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सातत्याने पडणारे खंड, कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस आणि असमान वितरण हे यंदाच्या मॉन्सून हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ऑगस्ट महिन्यातील अपुऱ्या पावसाने तर चिंतेत आणखीन भर घातली आहे. आता मॉन्सूनच्या उर्वरीत हंगामात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर विदर्भाचा बहुतांशी भाग दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडला.

२६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधी पडलेल्या सरासरी पावसाचा विचार करता धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, कोकणातील पालघरसह मुंबई उपनगरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक, म्हणजेच सरासरीच्या तुलनेत २६० टक्के अधिक पाऊस पडला आहे.

मात्र दडी कायम असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (उणे ८३ टक्के), कोल्हापूर (उणे ७४ टक्के) सांगली (उणे ६५ टक्के), रत्नागिरी (उणे ६८ टक्के), विदर्भातील अकोला (उणे ६८ टक्के), मराठवाड्यातील हिंगोली (उणे ६९ टक्के) जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण खुपच कमी होते. या शिवाय सिंधुदुर्ग, पुणे, बुलडाणा, वाशीम, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

पुढील दोन आठवड्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (३ ते ९ सप्टेंबर) राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तर दुसऱ्या आठवड्यात (१० ते १६ सप्टेंबर) कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भात चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी कमी राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पावसाच्या दडीमुळे उन्हाचा चटका वाढून तापमानातही वाढ झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये राज्यात कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २६ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यातही कमाल तापमानाचा पारा २८ ते ३२ अंश, तर किमान तापमान २० ते २२ अंशादरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading