पुणेकरांनी ‘सिंहावलोकन’ करण्याची गरज आहे – अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

पुणे : पुण्याचा गणेशोत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र आता आपल्याला ‘सिंहावलोकन’ करण्याची वेळ आली आहे. काय बरोबर? काय चूक? हे स्वतःला विचारण्याची गरज आहे.  इकोफ्रेंडली गणपतीची बसवण्याची सुरूवात पुण्यात झाली तर त्यांचे अनुकरण इतरत्र नक्कीच केले जाते. त्यादृष्टीने आपण पाऊले उचलली पाहिजेत, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

कोहिनूरच्या वतीने नदी व पर्यावरण रक्षणासाठी ‘इको बाप्पा सीजन 2’ प्रदान सोहळा आज पार पडला. यावेळी पर्यावरण रक्षणास हातभार लावण्याऱ्या ‘इको बाप्पाप्रेमींना’ मूर्ती प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी कोहीनूर ग्रुपचे सी. एम. डी कृष्णकुमार गोयल, पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, संयोजक विरेंद्र चित्राव, नयनिष देशपांडे, सुवर्णा भांबुरकर आदी यावेळी उपस्थित होते. ‘इको बाप्पा सीजन 2’ या उपक्रमा अंतर्गत पेण येथील कलाकारांनी तयार केलेल्या सुबक इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बॅकस्टेज कलाकार विनामूल्य पूजा साहित्य किट सह घरोघरी पोहचवणार आहेत.

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, या उपक्रमाच्या माध्यमातून पेणच्या कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. इकोफ्रेंडली बाप्पा असल्याने आपल्या सर्वांच्या मनावर एक चांगला संस्कार होईल. तसेच या मूर्ती बॅकस्टेज कलाकारांच्या हस्ते दिल्या जाणार असल्याने एक कलाकार म्हणून मला खूप आनंद होत आहे. ज्या प्रमाणे करोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या तसेच हा बाप्पा देखील आपल्याला अनेक नव्या गोष्टी शिकावेल. मात्र आता आपल्याला ‘सिंहावलोकन’ करण्याची वेळ आली आहे. काय बरोबर? काय चूक? हे स्वतःला विचारण्याची गरज आहे.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण होईल या हेतून ‘इकोफ्रेंडली बाप्पा’ या उपक्रमाची सुरूवात झाली. गेल्यावर्षी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने करोनामुळे रोजगार गमावलेल्या बॅकस्टेज कलाकारांच्या हाताला काम मिळेल. तसेच नांगरिकांचेही करोनापासून रक्षण होईल. दूसरा उद्देश म्हणजे, नुकतेच कोल्हापूर, रायगड आदी ठिकाणी पुरामुळे हाहाकार माजला होता. अतोनात नुकसान झाले. तेथील लोकांनाही यामुळे आर्थिक सहाय्य मिळेल. इकोफ्रेंडली गणपती हा 90 टक्के इकोफ्रेंडली असतो. अन् तो घरच्या घरीच विसर्जन केला जातो, हा संदेश पुणेकरांनी सर्वांना द्यावा, हीच अपेक्षा आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: