सौरऊर्जा यंत्रणा वितरण प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी महावितरण आणि सौर उत्पादक एकत्र

पुणे : सौर ऊर्जेचा प्रसार आणि वाढती मागणी लक्षात घेत ग्राहकांच्या हितासाठी त्यासंबंधी कार्यप्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (महावितरण) आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा) यांची एक संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये नेट मीटरिंग करताना येणाऱ्या विविध अडचणी सोडवणे, नेट मीटरिंग ॲप्लिकेशनसाठी लवकरात लवकर मंजुरी मिळणे, मीटर टेस्टिंग आणि तत्सम कामे एकमेकांच्या सहकार्याने लवकरात लवकर मार्गी लावण्यावर सकारात्मक चर्चा झाली तसेच संयुक्तपणे कमिटी स्थापन करण्यात आली. ज्यामध्ये महावितरणचे तीन अधिकारी आणि मास्माचे दोन सभासद यांचा समावेश आहे.

मास्माच्यावतीने समीर गांधी, जयेश अकोले तर महावितरणच्यावतीने मुख्य अभियंते (व्यावसायिक आणि तपासणी विभाग), मुख्य व्यवस्थापक यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आला आहे. समितीची स्थापना करण्यासाठी मास्माचे अध्यक्ष राजेश मुथा यांनी पुढाकार घेतला होता.
महाराष्ट्रामध्ये यापुढील काळामध्ये सौरऊर्जे अंतर्गत शासनाच्या विविध योजना महाविरतरणमार्फत कार्यान्वित होणार आहेत. त्याची रूपरेषा ठरविताना ऊर्जा क्षेत्रातील अग्रगन्य संस्था ‘मास्मा’च्या मताचा प्रामुख्याने विचार घेण्याचे महाविरतरणने आश्वासन दिले आहे. त्यामुळे सौर व्यवसायिक व ग्राहक यांना खूप चांगल्या पद्धतीने योजनेचा लाभ घेता येईल.
मास्माचे अध्यक्ष राजेश मुथा म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये यापुढील काळात सौर ऊर्जेचा वापर वाढतच राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला गुणवत्ता पूर्ण सौर उपकरणे, तत्पर सेवा मिळणे कामी मास्माचे नेहमीच सहकार्य महाविरतरणला राहणार आहे. सौर ऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी दोन्ही संस्था नेहमीच प्रयत्नशील राहणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: