गणेशोत्सवाच्या तोंडावर रत्नागिरीत एका घरात तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब सापडले

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांची कोकणात जाण्याची लगबग सुरू असतानाच रत्नागिरीत एका घरातून पोलिसांनी तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत केले आहेत. रत्नागिरी पोलिस, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोध आणि नाशक पथक यांनी मिळून ही कारवाई केली. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याने यामध्ये काही दहशतवादी कृत्य करण्याची तयारी तर नव्हती ना? याचा पोलिस तपास करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या देवरुख नजीकच्या हरपुडे येथील एका इसमाच्या घरात हे तब्बल 18 जिवंत गावठी बॉम्ब सापडले. संबंधित घटना ही बुधवारी (1 सप्टेंबर) रात्री उशिरा उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी 48 वर्षीय आरोपीला अटक केली असून सुरेश आत्माराम किर्वे असे आरोपीचे नाव  आहे. आरोपी सुरेश किर्वे याच्या घरात जिवंत गावठी बॉम्ब असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलीसांनी आधी सापळा रचला. अन् योग्य संधी मिळताच आरोपी सुरेश किर्वे याच्या घरावर  छापा टाकला. यावेळी घरात सापडलेला शस्त्रसाठा बघून पोलीसही चक्रावले.  या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील करीत आहेत. दुसरीकडे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: