अंनिसच्या पाठपुराव्याने 14 जणांविरोधात सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल

पुणे : पत्नीपासून अलिप्त होण्यासाठी घटस्फोटाचा दावा जातपंचायतऐवजी न्यायालयात दाखल केल्याने जातपंचायतीने मुलाच्या कुटुंबियांना वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वाकड येथे घडली आहे. मुलासह कुटुंबियांना पावणे तीन वर्षांपासून जातपंचायतीच्या हुकुमावरून समाजातून बहिष्कृत केले आहे. त्यामुळे जातपंचांयतीचे पाटील, पंच यांच्यासह 14 जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या कलम 5 व 6 नुसार आणि भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 120-बी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. जातपंचायतीचे पाटील आणि पंच म्हणून मुलीचे आजोबा, मामा हे काम पाहत असून त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आकुर्डी पुणे शाखेच्या पुढाकाराने हा गुन्हा दाखल झाला आहे. सागरे कुटुंबियांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने पोलिसांकडे केली होती.

करेप्पा मारुती वाघमारे, बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे (सर्व रा. वाल्हेकरवाडी), मोहन शामराव उगाडे (रा. ताथवडे), मनोज सागरे, विजय सागरे (रा. वारजे माळवाडी) रामदास भोरे (रा. हिंजेवडी), अमर भोरे, महादेव भोरे (रा. मुंबई), मारुती वाघमारे (रा. उरळीकांचन), विष्णू वाघमारे (उडगी, अक्कलकोट), अमृत भोरे, गोविंद भोरे (रा. मुंबई) या 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सिताराम कृष्णा सागरे (वय 33 वर्षे, रा. वाकड ) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. सीताराम सागरे यांचा 01 जानेवारी 2013 रोजी शितल भोरे यांच्याशी विवाह झाला. मार्च 2018 मध्ये नवरा बायकोमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. कुटुंबीय नातेवाईक हे पत्नी शीतल हिला माहेरी घेऊन गेले. सागरे यांनी पत्नी शीतल भोरे यांच्यापासून अलिप्त होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात डिसेंबर 2018 मध्ये दावा दाखल केला आहे. मात्र भारतीय राज्यघटनेच्या विसंगत आणि भारतीय न्याय व्यवस्थेच्या समांतर असलेल्या शोषणकारी जातपंचायत ऐवजी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केल्याने सागरे कुटुंबियांना पावणे तीन वर्षांपासून जातपंचायतीच्या हुकुमावरून समाजातून बहिष्कृत केले आहे.

जातीचे ठराविक लोक पंच म्हणून काम करत असून त्यातील मुख्य पंचाला पाटील म्हणण्याची प्रथा आहे. विशेषतः पत्नी शीतल यांचे आईचे वडील अर्थात आजोबा करेप्पा मारुती वाघमारे आणि मामा बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे हे जातपंचायतीचे पाटील म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पुढाकारानेचे सागरे कुटुंबियांना समाजातून बहिष्कृत करून अमानवीय वागणूक देण्यात आली आहे. सागरे कुटुंबियांशी कुणी संबंध ठेवू नये, ठेवल्यास त्यांनाही वाळीत टाकू असे फर्मान जातपंचायतीने काढले आहे. सागरे कुटुंबियांना समाजातील, नात्यातील सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी करून घेतले जात नसून त्यांच्याही कार्यक्रमांना कुणाला येऊ दिले जात नाही. वाळीत टाकण्याबाबत सागरे कुटुंबीयांनी जातपंचायतीचे पाटील आणि पंचांना विचारणा केली असता वाळीत टाकण्याचे कृत्य योग्यच असल्याचे त्यांचे मत आहे. मिटिंगचे फोटो काढले असता सीताराम सागरे यांना पंचांनी मारहाण केली असून त्यांचा चष्मा फोडला. सागरे कुटुंबियांशी गावाला कुणी बोलत नाही. घरच्या कार्यक्रमाला कुणी येत नाही. सागरे कुटुंबियांकडून दरवर्षी घेतली जाणारी जीवगंता वर्गणीही घेतली जात नाही. तसेच त्या वर्गणीचे समाजात वाटप होते. मात्र ते वाटप सागरे कुटुंबियांना दिले जात नाही. चुलत्यांनी लग्न पत्रिकेत सीताराम सागरे यांच्या वडिलांचे नाव टाकले म्हणून त्यांचीही वर्गणी घेतली जात नाही, अशी कृत्य जातपंचायतीच्या हुकुमावरून घडत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: