Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

कोरोना काळात पोलीस प्रशासन कर्तव्य भावनेतून सेवा करीत आहेत – शैलेश बलकवडे

पिंपरी : पोलीस प्रशासनाने कोरोना काळामध्ये स्वतःच्या जीवावर उदार होऊन कर्तव्य भावनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेची आणि कोरोना रुग्णांची जबाबदारी घेऊन सेवा करीत आहेत. पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोना काळामध्ये तातडीने सर्व आरोग्य सुविधा देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलातील पोलिस बांधवांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवितहानीचं प्रमाण देखील कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
कोल्हापूर पोलीस आयुक्तालय येथे गुरुवारी मानिनी फाऊंडेशनच्या वतीने कोल्हापूर पोलीसांना 4000 मास्कचे वाटप करण्यात आले. 

कोल्हापूर पोलीसांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक (गृह) पद्मा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा दलातील विविध खात्यांमधील महिला पोलिस अधिकारी आणि मानिनी फाऊंडेशनच्या जिल्ह्यातील समन्वयक आणि पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रांमध्ये महिला सुरक्षा, महिला पोलिस अधिकार्‍यांसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याबाबत पोलिस यंत्रणा आणि मानिनी फाउंडेशन यांच्यामध्ये समन्वय ठेवून महिलांसाठी कार्य करण्याचे ठरवण्यात आले. चर्चासत्रामध्ये महिला पोलीस नाईक सुनिता सोनसुळकर, महिला सहाय्यक फौजदार नलिनी लोळगे, महिला पोलीस नाईक रेखा कामत, पोलीस कॉन्स्टेबल दिपाली डावखुरे, रेखा पाटील, अश्विनी पाटील, निर्मला जाधव, विजया सामवेकर, प्राध्यापक डॉक्टर स्मिता गिरी, संगीता साळोखे आदी महिलांनी सहभाग घेतला.

अध्यक्षीय भाषणात मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी मानिनी फाऊंडेशन ही महिलांसाठी आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक अत्याचार आणि स्वयंरोजगार या विषयी देशभर कार्य करणारी अग्रगण्य संस्था असल्याचे सांगितले. महिलांना सामाजिक प्रवाहामध्ये आणून समाज रचनेचा मानवतावादी पाया घालण्याचे काम मानिनी फाउंडेशन करत आहे. महिला सक्षमीकरण होण्यासाठी महिलांनी आर्थीक सक्षम होण्याची गरज आहे. शहरी आणि ग्रामीण महिलांसाठी मानिनी फाउंडेशन घरगुती उद्योग तसेच शेती उद्योग उभारून, महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देत आहे याबाबतचीही माहिती डॉ. भारती चव्हाण यांनी दिली. तसेच महिलांच्या हाती आर्थिक सत्ता आल्यास त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढूवून कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण निश्‍चितच कमी होईल असाही विश्वास डॉ. भारती चव्हाण यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक व स्वागत स्वाती शहा, आभार एपीआय फाळके यांनी मानले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading