पुणेरी ‘गोरे आणि मंडळी’ची शतकपूर्ती

  • राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिली होती भेट –

पुणे : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अस्सल खादीचे कपडे, पंचे आणि इतर साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण असणारे पुण्यातील शनिपार चौक येथील ‘गोरे आणि मंडळी’ उर्फ पंचेवाले गोरे यांनी शतकपूर्ती करून पुण्याच्या इतिहासात आणखी एक नोंद केली आहे. विशेष म्हणजे आपल्या पूर्वजांचा वारसा चालवण्यासाठी चौथ्या पिढीतील महिलांनी व्यवसाय सुरू ठेऊन नवा आदर्श घालून दिला आहे. अतिशय कसोशीने आणि हिंमतीने त्या पुण्याची संस्कृती, कला, सण,उत्सव ,परंपरा सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.आश्लेषा गोरे आणि मौसमी गोरे – घैसास या महिला व्यवसाय म्हणून नाही तर अत्यंत माफक दरात सेवा देणे व पूर्वजांचा वारसा आणि पुण्याची संस्कृती टिकवण्यासाठी कार्यरत आहेत . त्यांचा हा आदर्श समाजासाठी प्रेरणा देणारा आहे.

‘पंचेवाले गोरे’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘गोरे आणि मंडळी’ या दुकानाची स्थापना पटवर्धन वाड्यात १९२१ मध्ये श्रीधर महादेव गोरे यांनी केली. श्रीधर गोरे हे कोकणातून उपजिविकेसाठी पुण्यात आले होते .त्यावेळी दाजीसाहेब पटवर्धनराजे यांनी त्यांना करकुनाची नोकरी दिली. पुढे आपल्या वाड्यातील स्वतःची जागा देऊन व ७०० रुपये भांडवल देऊन या व्यवसायाला सुरुवात करण्यास प्रोत्साहन दिले .सुरुवातीला अहमदाबाद आणि वर्धा येथून खादीची मागणी करून केवळ खादीचे भांडार म्हणून याची सुरुवात झाली. पुढे भारतीय सण ,उत्सव ,धार्मिक कार्यक्रम यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्त्रांची विक्री करण्यात येऊ लागली . पातळ, खण, नऊवारी साड्या ,धोतर जोड्या ,नंतर बनारसी शालू,याची विक्री होत होती .

सध्या दुकानात धोतर, पंचे, सोवळे, उपरणे, शेले, शाली, पगड्या याबरोबरच खण, इरकल अशा पारंपरिक कापडापासून तयार केलेले लहान मुलींचे फ्रॉक, परकर पोलके, तसेच तयार नऊवार व सहावार साड्या, दागिने, मुलांचे व पुरुषांचे कुर्ते अशा विविध वस्तू मिळतात.पूर्वी पुण्यात बऱ्याच ठिकाणी खानावळीत जेवायला देखील सोवळे लागत असे किंवा मुकटा नेसण्याची सक्ती केली जात असे. अशा बऱ्याच आठवणी व किस्से श्रीधर गोरे यांचे नातू डॉ. धंनजय गोरे सांगतात.

याबाबत डॉ. धनंजय गोरे म्हणतात, ‘१९२५ मध्ये पुणे महापालिकेने महात्मा गांधी यांचा सत्कार समारंभ ठेवला होता . त्यावेळी गांधी यांनी ‘गोरे आणि मंडळी’ दुकानास भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले होते’

आज पुणे शहरात विविध प्रकारचे व्यवसाय, उद्योग आहेत. नवीन उद्योग होत आहेत. वर्षानुवर्षे विविध अडचणी ,समस्या यांना सामोरे जात हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम ‘गोरे आणि मंडळी’ करीत आहेत. पुणे शहराला अभिमान आणि आपुलकी वाटणारे ‘गोरे आणि मंडळी‘ यांनी आज १०० वर्षे पूर्ण करून पुणेकरांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोचला आहे, असेच म्हणावे लागेल. शतकपूर्ती ही पुणेकरांच्या दृष्टीने अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: