fbpx

प्रधान मास्तरांचे पुण्यात स्मारक व्हावे: डॉ शां. ब. मुजुमदार 

पुणे : पुण्यात अनेक मोठ्या लोकांचे पुतळे आणि स्मारके आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे या विद्यानगरीत तत्वनिष्ठ आणि  हाडाचे शिक्षक असलेल्या प्रधान मास्तरांचे स्मारक व्हावें. ते पुढच्या पिढ्यातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रेरक ठरेल  असे मत सिंबायोसिस  आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ शां. ब. मुजुमदार यांनी असे  व्यक्त केले. निमित्त होते समाजशिक्षक ,साक्षेपी लेखक आणि विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभाचे.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, साधना साप्ताहिक, साहित्य शिवार दिवाळी अंक आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रा. ग. प्र. प्रधान यांची विचारसृष्टी आणि समकालीन राजकारण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.., महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साधना साप्ताहिकाचे  संपादक  विनोद शिरसाठ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, एस. के. कुलकर्णी त्यात सहभागी झाले होते. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, साहित्य शिवार दिवाळी अंकाचे संपादक जयराम देसाई, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिक राठिवडेकर उपस्थित होते. प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या ‘स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत’  आणि ‘माझी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिरसाठ म्हणाले, प्रधान सरांनी स्वत:च्या मर्यादांविषयी स्वत:च प्रांजळपणे लिहून ठेवले त्यामुळे त्यांच्यावर कधीही टीका झाली नाही. त्यांचे अप्रकाशित साहित्य या वर्षात साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित केले जाईल.
जोशी म्हणाले, ‘ आजच्या  राजकारणामुळे कलुषित झालेल्या समाज जीवनात   प्रधान सरांचे   जीवन दीपस्तंभाप्रमाणे आहे.वैयक्तिक आशा आकांशाच्या पलीकडे जाऊन समाजहिताचे तत्वनिष्ठ राजकारण कसे करता येते याचा आदर्श प्रधान सरांनी घालून दिला. ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधींनी कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हटले होते त्या महाराष्ट्रात आज कुठे गेले कार्यकर्ते असा प्रश्न विचारावा लागतो ही शोकांतिका आहे. विचारवंतांची कृतिशून्यता आणि कृतिवीरांची विचारशून्यता या दोन्ही गोष्टी समाजासाठी घातक आहेत.
गोखले म्हणाले, ‘ प्रधान सरांची भाषणे आजच्या लोक प्रतिनिधींनी अभ्यासली पाहिजेत. त्यांची विचारसृष्टी चौफेर वाचनातून घडली होती.
कुलकर्णी म्हणाले, प्रधान मास्तरांसारखे शिक्षक आता होणे नाही.  ते विद्यार्थ्यांवर प्रेम करत. ते समाज शिक्षक होतें. सर्वत्र शिक्षक म्हणूनच ते  वावरले. जयराम देसाई यांनी प्रास्ताविक केले.प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. रसिका राठीवडेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: