मदतीसाठी नेहमी स्वतःपासून सुरुवात करावी- नाना पाटेकर

नाम फाउंडेशनतर्फे बहुलीतील ग्रामस्थांना घरे सुपूर्द

पुणे :  पूर, आग अशा अचानक येणाऱ्या आपत्तीमध्ये गरजूंच्या मदतीसाठी नेहमी स्वतःपासून सुरुवात करावी, असं प्रतिपादन नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता नाना पाटेकर यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील बहुली या गावी १६ कुटुंबीयांची घरं जळून खाक झाली होती. या कुटुंबांना दिलासा मिळावा यादृष्टीने नाम फाउंडेशतर्फे नवी घरं देण्यात आली. या घराच्या चाव्या आज अभिनेता नाना पाटेकर यांच्या हस्ते १६ ही कुटुंबांना सुपूर्द करण्यात आल्या. गावातील महिलांनी औक्षण करून, रांगोळी काढून नाना पाटेकर यांचे स्वागत केले. मार्चमध्ये या गावात आगीची विदारक घटना घडली होती. अनेक कुटुंबांना आपल्या डोळ्यांदेखत घर भस्मसात झाल्याचं पहावं लागलं होतं. आज मात्र नव्या घरात पाऊल टाकताना या कुटुंबीयांचे चेहरे समाधानाने फुलून गेले होते.

यावेळी नाना पाटेकर म्हणाले, ’आगीच्या भीषण घटनेनंतर याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी खूप भीषण चित्र पहायला मिळालं होतं. अशी वेळ कुणावरही येऊ नये, आज या सगळ्या मंडळींना एक छोटा दिलासा मिळाला याचा आनंद आहे. परिसरातील अनेकजणांनी याकामी मदत केली. आपण सगळेचजण एकदिलाने एकत्र आलो की काय काम होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. श्रेयाचे राजकारण करत बसण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात केली की ते काम आपोआप एकत्रित पुढे जाते.‘

Leave a Reply

%d bloggers like this: