ज्येष्ठ नागरिक महिलेचा सुनेने सराईत गुन्हेगार असलेल्या भाचाच्या मदतीने केला खून

पुणे – येरवड्यातील बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेचा सुनेने सराईत गुन्हेगार असलेल्या भाचाच्या मदतीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. या घटनेत सोजराबाई दासा जोगदंड (वय 70, रा. लक्ष्मीनगर येरवडा) यांचा खून करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी त्यांची सून आरोपी मुन्नी गेना जोगदंड (वय 35, रा. लक्ष्मीनगर येरवडा) व तिचा भाचा सराईत गुन्हेगार इम्तियाज मुस्ताक शेख (वय 25, रा. ओटास्कीम, निगडी) यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.

सोजराबाई जोगदंड या लक्ष्मीनगर येरवडा येथे राहायला होत्या. मुलाने केलेला आंतरजातीय विवाह व जमीन विक्री प्रकरणावरून सुन मुन्नी हिचे सोजराबाई सोबत वारंवार भांडणे होत होती. 14 जुलै रोजी सोजराबाई येरवडा येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची मुलगी ललिता गायकवाड यांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे नोंदवली होती. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय कडील युनिट 2 च्या पोलिसांना निगडी येथील सराईत गुन्हेगार इम्तियाज शेख याने सदर जेष्ठ नागरिक महिलेचा खून केल्याची माहिती मिळाली होती.

सोमवारी त्याला ताब्यात घेतल्यानंतर मावशी मुन्नी जोगदंड हिच्या सांगण्यावरून सोजराबाई यांचा 14 जुलै रोजी रात्री गळा आवळून खून केला. त्यांचा मृतदेह त्याच रात्री उशिरा देहूरोड येथील पुणे मुंबई हायवे लगत झुडपांमध्ये चादरीत गुंडाळून फेकून देण्यात आला होता. घटनास्थळी देहूरोड पोलिसांना सोजराबाई यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळाला. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील बेपत्ता ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृतदेह मिळून आल्यानंतर देहूरोड पोलिसांनी आरोपी इम्तियाज शेख याला अटक केली असून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इम्तियाज शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर निगडी व खडकी येथे यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील दुसरी आरोपी मुन्नी जोगदंड हिला मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास देहूरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे करीत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: