BIG NEWS: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश
नाशिक/ पुणे :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. नाशिकमध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. तसेच पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशन मध्येही राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
समाजामध्ये तेढ, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकतो. त्यानुसार नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यात येऊ शकतो. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे.नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली.मंत्रालयातील स्वातंत्र्यदिनाचा दाखला देत ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, असे आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. जनआशिर्वाद यात्रा निमित्त नारायण राणे आज चिपळूनमध्ये आहेत.
येथे नाशिक पोलिसांची टीम पोहचल्यानंतर त्यांना अटक करणार असल्याचे समजतेय. या सर्व घटनामुळे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष समोर आला आहे.
काय म्हणाले होते राणे?
राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती,’’ असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान त्यांना नाही. आपल्याला माहीत नसेल तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले.
देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखालीच वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन गद्दारी करीत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी केली. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदतकार्य करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
