पुणे विद्यापीठ आणि इंडियन काॅन्सिल फाॅर कल्चरल रिलशन्सतर्फे अफगाण विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत
पुणेः-भारत आणि अफगाण यांच्यातील संबंध घनिष्ठ असून शिक्षणानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंडियन काॅन्सिल फाॅर कल्चरल रिलशन्स पूर्ण ताकदीने उभे असल्याची ग्वाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर आणि इंडियन काॅन्सिल फाॅर कल्चरल रिलशन्सचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज संयुक्तरीत्या दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अफगाण विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटना कार्यालयात कुलगुरूंची भेट घेतली, त्यावेळी डाॅ. नितीन करमळकर बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आणि सरहद संस्थेचे संजय नहार यांच्या पुढाकारातून या औपचारिक भेटीचे आज आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अफगाण विद्यार्थ्यांशी समन्वय साधण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अफगाण माजी विद्यार्थी संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या हेल्प-लाईनचे देखील कुलगुरूंच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ज्या अफगान विद्यार्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तोडगा म्हणुन 020-25621938 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. पुणे विद्यापीठ आणि सरहद संस्था ह्या सर्व कार्यात हातात हात घालून येत्या काळात काम करणार असल्याचे डाॅ. नितीन करमळकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्र-कुलगुरू एन.एस.उमरा णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, सरहद संस्थेचे संजय नहार,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी कार्यलयाचे संचालक संजय ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अफगाण माजी विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या विविध समस्यांवर बोलतांना कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील वसतीगृहात ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही कारणास्तव राहणे अवघड किंवा असुरक्षित वाटत असेल अशा अफगाण विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सेंटरच्या वसतिगृहात सोय करण्यात येईल. तसेच ज्या विद्यार्थांना पुण्यात शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या पालकांकडून पैसे येत होते पंरतू अफगाण मध्ये सध्या उपस्थित झालेल्या परिस्थिमुळे त्यांना पैसे येणे बंद झाले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंडियन काॅन्सिल फाॅर कल्चरल रिलेशन्स तर्फे सहानभुतीपूर्वक विचार करण्यात येऊन त्यांना शूल्कात माफी किंवा शूल्कात कपात देण्यासंदर्भात गांभिर्यानंं विचार केला जाईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना रोजगाराची नितांत गरज आहे अशा विद्यार्थ्यांना देखील सर्वोतोपरी मदत केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना मिळालेली शिष्यवृत्तीचा कालावधी वाढविण्याबाबत ही पूर्नविचार करता येईल.
