व्यायाम आणि योग्य आहारातून सुदृढ जीवनाचा पाया – आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड
पुणे : तंदुरुस्त राहणे ही काळाची गरज आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचसोबत खाणे देखील निकृष्ट दर्जाचे खाल्ले जाते. त्यामुळे व्यायाम आणि योग्य आहाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भावी सुदृढ जीवनाचा पाया व्यायाम आणि योग्य आहारातून रचला जातो. असे मत शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांनी व्यक्त केले.
बॉडीविझार्ड फिटनेस अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आणि न्युट्रीशनचा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अकॅडेमीचे संचालक अमोल क्यातम, मकरंद कलबुर्गी, बाळकृष्ण निढाळकर यावेळी उपस्थित होते. दिनेश गुंड आणि मनोज शाह यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
दिनेश गुंड म्हणाले, फिटनेस आणि न्युट्रीशन याचा अभ्यास केल्यास करीयरच्या अनेक संधी उपलब्ध होतील. व्यक्तीमत्व विकास आणि जीवनात येणारी आव्हाने पेलण्याच्या दृष्टीने देखील फिटनेस आणि न्युट्रीशन महत्त्वाचे ठरते. देशाचे नाव उंचावण्यासाठी तरुणांनी क्रीडाक्षेत्राकडे वळायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
