Thursday, November 19, 2026
BusinessLatest NewsPUNE

पुणे जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनला राज्य शिखर प्रशिक्षण संस्थेचा दर्जा

पुणे : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे या संस्थेला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम २४ अ नुसार राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. राज्य शासनाने याला नुकतीच मान्यता दिली आहे. शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून दर्जा मिळाल्यामुळे असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येणा-या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांना मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते यांनी दिली.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम २४ अ मध्ये राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या संचालक, सेवकांना राज्य संघीय संस्था अथवा राज्य शिखर प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण घेण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रात २ लाखांपेक्षा जास्त सहकारी संस्था अस्तित्वात असून त्यांच्या संचालक व सेवकांची संख्या अनुक्र मे सुमारे २५ लाख व ३.५ लाखांपेक्षा जास्त आहे. आत्तापर्यंत ११ संस्थांना राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देण्यात आली होती. मात्र, सहकारी संस्थांतील संचालक व सेवकांची एकूण संख्या लक्षात घेता ही संख्या अपुरी होती.

अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे ही संस्था नागरी सहकारी बँकांच्या संचालक, सेवक प्रशिक्षणाचे कार्य गेली ४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून करीत आहे. दरवर्षी साधारणपणे ६० पेक्षा जास्त प्रशिक्षण कार्यक्रमाम्मधून २००० ते २५०० संचालक सेवकांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. यासाठी असोसिएशनकडे स्वत:चा सुसज्ज प्रशिक्षण हॉल, मोठी लायब्ररी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
प्रशिक्षण देण्यासाठी असोसिएशनकडे १०० हून अधिक बँकिंग तज्ञ, विधीज्ञ, कौशल्य प्रशिक्षक यांची नावे नामतालिकेमध्ये आहेत. याशिवाय पुण्यातील नागरी सहकारी बँकेतील तज्ञ सेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक हे देखील आनंदाने प्रशिक्षण देण्याची धुरा उचलित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध बँकांमधून त्यांच्या सेवकांना असोसिएशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना आवर्जून पाठविले जाते. याशिवाय अनेक विषयांवर असोसिएशनतर्फे विनामूल्य कार्यशाळा देखील घेतल्या जातात.

यापुढे नागरी सहकारी बँकांना उत्तम अधिकारी मिळणे ही मोठी समस्या भेडसावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून वरिष्ठ पातळीवरील जबाबदा-या कशा पेलाव्या, यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. याचा सर्वच नागरी बँकांना फायदा होईल.

Leave a Reply