Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

ससून रुग्णालयातील सहा मावशींचा पुरस्कार देत सन्मान    

पुणे: पुण्यातील अमनोरा येस फाउंडेशनच्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालयात गेली अनेक वर्षे काम करीत असलेल्या सहा मावशींचा ‘उत्कृष्टता सेवा सन्मान पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत बी जे वैद्यकीय महाविद्यालयात सदर कार्यक्रम पार पडला.

लता दस्तुरे, कमल लोट, नीता शिंदे, शोभा सोळंकी, दिपाली कांबळे, आफ्रिन शेख या मावशींना या वेळी प्रमुख पाहुणे असलेल्या डॉ. सतीश साकोरे यांच्या हस्ते पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे हे सलग तिसरे वर्ष असून रोख रु. ११ हजार, शाल, साडी व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. समीर जोशी, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. अजय तावरे, डॉ. विजय जाधव, सुनीता खातगावकर आणि गणेश बडदरे आदी मान्यवर देखील या वेळी उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेणा-या आर्थिक दुर्बल घटकातील निकिता धेंडूले, रोहिणी हवरगे, रागिणी पंडित या तीन विद्यार्थीनींना देखील या वेळी प्रत्येकी १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मागील तीन वर्षांत अमनोरा येस फाउंडेशनच्या वतीने १८ मावशी व ९ विद्यार्थीनींना अशा प्रकारे मदतीचा हात देण्यात आला आहे.

या वेळी बोलताना डॉ. सतीश साकोरे म्हणाले, “वैद्यकीय सेवेत डॉक्टरांसोबत काम करणारा नर्सिंग स्टाफ, मावशी यांचा देखील मोठा वाटा आहे. हे सर्व जण या क्षेत्राचा कणा असून त्यांचे कौतुक आणि सन्मान हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. नर्सिंग स्टाफ व मावशी यांचे काम भावनिक असते, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाचे श्रेय मिळणे गरजेचे आहे. अमनोरा येस फाउंडेशनने हेच लक्षात घेत केलेल्या या त्यांच्या सन्मानाबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे मत डॉ. तांबे यांनी व्यक्त केले. अमनोरा येस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply