भारती विद्यापीठाच्या आम्ही ‘ भारती’ य मोहिमेचा शुभारंभ
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राबविणार विविध उपक्रम, डॉ विश्वजित कदम यांची घोषणा:
पुणे: . डॉ पतंगराव कदम यांचा सामाजिक उत्तर दायित्वाचा संस्कार जपणाऱ्या भारती विद्यापीठाने गेल्या पाच दशकात कर्तृत्व संपन्न विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या. आज जगभर भारती विद्यापीठाचे कर्तृत्ववान माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. जगभरातले विद्यापीठाचे माजी व आजी विद्यार्थी तसेच माजी व आजी शिक्षक, शिक्षकेतर सेवक तसेच हितचिंतक या सर्वाँना एकमेकांशी जोडण्यासाठी विद्यापीठातर्फे ‘आम्ही भारती’ य ही मोहीम राबविण्यात येणार असून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्या द्वारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी घोषणा भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांनी केली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारती विद्यापीठाच्या आम्ही भारतीय या मोहिमेच्या शुभारंभानिमित्त बोधचिन्हाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.
भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ अस्मिता जगताप, सह कार्यवाह व भा. म्हेत्रे, डॉ एम. एस. सगरे, डॉ के. डी. जाधव, कुलसचिव जी जयकुमार यावेळी उपस्थित होते. डॉ कदम म्हणाले
वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी डॉ. पतंगरावजी कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यांची प्रेरणा, त्यांनी दाखविलेली दिशा आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून भारती विद्यापीठाने राष्ट्र उभारणीत मोलाची भूमिका बजावली आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारती विद्यापीठदेखील हीरक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या ५८ वर्षांमध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील, तळागाळातील, सर्वसामान्य, कष्टकरी कुटुंबातील युवा पिढीला शिक्षणातून समृद्धीकडे नेण्यासाठी विद्यापीठ झटत आहे. शिक्षणातून समाज परिवर्तनाकडे या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील आहे.
कर्मचारी वर्गापासून ते माजी विद्यार्थ्यांचे मोठे जाळे गावपातळी पासून ते जगभर विणले गेले आहे. ते आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावत आहेत. केवळ पदवीधर, उच्चशिक्षित पिढी निर्माण करणे एवढ्यापुरतेच भारती विद्यापीठाचे ध्येय मर्यादित नाही. तर देशहिताने प्रेरित, भविष्याकडे झेप घेणारी सुसंस्कृत आणि सामाजिक भान असलेली पिढी घडवण्याच्या व्यापक ध्येयाने विद्यापीठ कार्यरत आहे.
आजच्या ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने आम्ही भारतीय ही मोहीम जाहीर करीत आहे. भारती विद्यापीठाचा कर्मचारी वर्ग, माजी व आजी विद्यार्थी आणि शुभचिंतकांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विद्यापीठ हाती घेणार आहे.
या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी समाजाकडून नेहमीप्रमाणेच मनापासून उदंड सहकार्य मिळेल असा विश्वास वाटतो. डॉ शिवाजीराव कदम म्हणाले, विद्यापीठाने घडविलेले कर्तृत्ववान विद्यार्थी हीच विद्यापीठाच्या कार्याची खरी ओळख आहे. विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच नेहमी समाजहिताला प्राधान्य दिले. ‘आम्ही भारती’य या मोहिमेच्या माध्यमातून निर्माण होणारा संवाद सेतू विद्यापीठाच्या सामाजिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल. डॉ माणिकराव साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ विवेक रणखांबे यांनी आभार मानले.
