‘आमचे नेते अजितदादा, मुख्यमंत्री जाऊ द्या मरू द्या…’ शिवसेनेचा संताप आणि भरणेची दिलगिरी
सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली आहे. सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. यावर शिवसेनेचे कार्यकर्ते चांगेलच संतापले आहेत. दरम्यान पालकमंत्री भरणे यांनी या वक्तव्याचे गांभीर्य ओळखून लगेच याप्रकरणी दिलगिरीही व्यक्त केली आहे.
भरणे सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा एका वाक्यात मुख्यमंत्री जाऊ द्या मरू द्या… असा उच्चार त्यांनी केला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. भरणे हे सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यानंतर बोलण्यासाठी पुढे आले. तेव्हा ते म्हणाले, ‘मी खूप समाधानी आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत. जे काय असेल ते आमच्या दादांना आशीर्वाद द्या. मला कलेक्टर व संबंधितांनी परवानगी दिली आहे. येथे चांगले आपल्याला गार्डन करायचे आहे. नगरोतन्नमधून आपल्याला एक कोटी निधी देईचा. तुमचा प्रस्ताव कधी येईल मला सांगा? असे त्यांनी सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांना विचारले. त्यावर महापौर म्हणाल्या मुख्यमंत्र्यांना निधी मागायचा आहे अजून. त्यावर पालकमंत्री भरणे म्हणाले, मुख्यमंत्री जाऊ द्या मरु द्या आपलं आपण करू. मुख्यमंत्र्यांकडून आपण मोठा निधी घेऊ. आपण सुरुवात तर करू. कलेक्टर आहेत, तुम्ही आहेत, आयुक्त आहेत. आपण कामाची सुरुवात करू, असे ते म्हणाले. पालकमंत्री भरणे यांच्या या विधानावर संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते ‘यांचा’ झाला सन्मान, करमाळ्यातील यांचा आहे समावेश
शिवसेना उपनेते व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख भूम- परंडा- वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत म्हणाले, ‘महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर येथे केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांनी महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या व शिवसेना परिवाराच्या भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागावी. शिवसेनेचे नगरसेवक गुरूशांत धुतरगावकर यांनीही पालकमंत्री भरणे यांच्याशी फोनवर बोलून माफी मागावी अशी मागणी केली आहे.
यावर पालकमंत्री भरणे यांनी माझ्या वक्तव्याचा अनार्थ काढला असल्याचे म्हटले आहे. माझे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. महाविकास आघाडी सरकारचे अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्याप्रकारे काम करत आहे.
