टास्क फोर्सच्या विरोधामुळे १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती
मुंबई : दोन दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने ग्रामीण भागातील पाचवी पासून पुढील वर्ग तर शहरी भागातील ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास १७ ऑगस्ट पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील घोषणा केली होती. सध्या कोरोनाची लाट ही ओसरली असून निर्बंध देखील शिथिल केले जात आहेत.
मात्र अद्यापही संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या निर्णयाचा गोंधळ हा समोर आला आहे. शाळा सुरु करण्याबाबतच्या जीआरला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्स सोबतच्या झालेल्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्या संभ्रमतेत अधिक वाढ झाली आहे.
बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि काही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये लहान मुलांच्या आरोग्य संदर्भात आणि शाळा सुरू करायच्या की नाही यावर चर्चा झाली. ज्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी शाळा सुरु राहतील, मात्र सरसकट शाळा सुरु करता येणार नाही असं तज्ञांनी मत व्यक्त केलं. त्यामुळे येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडलेला दिसतोय.
