fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

कुपोषित बालकांच्या पोषण आहारात स्थानिक अन्न घटकांचा समावेश करा-ॲड. के.सी.पाडवी

नंदुरबार : कुपोषित बालकांवर उपचार करताना त्यांचा आहारावर विशेष लक्ष द्यावे आणि आहारात गावरान अंडी, मोहफुलांपासून बनविलेले पदार्थ, स्थानिक तांदूळ आणि  भगरीसारख्या पौष्टिक अन्न घटकांचा आहारात समावेश करावा , असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत  आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी मैनक घोष, मीनल करनवाल, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, मोहफुलपासून तयार केलेले पदार्थ आणि भगरीची लापशी बालकांना देण्यात यावी. या दोन्हीमध्ये  आवश्यक अन्नघटकांचे प्रमाण जास्त असते. गावरान कोंबड्यांच्या अंड्यातही पौष्टीक घटकांचे प्रमाण जास्त असते. पोषण अहारात या घटकांचा उपयोग केल्याने मुलांचे पोषण चांगल्यारितीने होईल.

बालकांवर अशा स्वरुपाच्या पोषण आहाराचा परिणाम तपासण्यासाठी प्रायोगिक तत्वावर  तीन महिने 50 बालकांना पारंपरिक आहार आणि 50 बालकांना नव्या घटकांचा समावेश असलेला आहार देण्यात यावा. बालकांच्या वजनात दर आठवड्यात होणाऱ्या बदलांची नोंद करण्यात यावी. नवापूर, तळोदा परिसरात स्थानिक तांदळाच्या उपयोग करावा. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास त्या आधारे व्यापक उपाययोजना राबविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीदेखील उपलब्ध करून देण्यात येईल.

कुपोषणाचा प्रश्न सामाजिक असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरिकांनाही या समस्येबाबत अधिक जागरूक करावे लागेल. जिल्ह्यातून कुपोषण कायमचे घालविण्यासाठी कुपोषित बालकांचे वजन वाढल्यानंतरही काही काळ त्यांच्या प्रकृतीविषयी नोंद ठेवण्यात यावी. बाल विवाह होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. गरोदर मातांच्या आहार आणि आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे. आरोग्य आणि बालविकास विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कुपोषण कमी करण्यासाठी गांभिर्याने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती वळवी म्हणाल्या, मातांना  पौष्टीक आहाराचे महत्व समजावून सांगावे. अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यात बैठक घेऊन कुपोषण कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घ्यावा. स्थानिक पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने त्याचा मुलांना चांगला फायदा होऊ शकेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading