कार अडवून चालकाला बोलण्यात गुंतवून 12 लाखांची रोकड तिघांनी पळविली
चाकण : कार मधून 12 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असलेल्या एका कार चालकाला तीन अनोळखी व्यक्तींनी अडवले. कार चालकाला बोलण्यात गुंतवून एका व्यक्तीने त्यांच्या कारमधून 12 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे घडली.
राजू रावसाहेब बो-हाडे (वय 37, रा. करुले, ता. संगमनेर, अहमदनगर) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बो-हाडे त्यांच्या कार मधून (एम एच 17 / बी एक्स 7576) बारा लाख रुपये रोख रक्कम पुण्याला घेऊन जात होते. तळेगाव चौक चाकण येथे अनोळखी 3 इसमांनी फिर्यादी यांची गाडी आडवली. त्यानंतर कट का मारला असे म्हणून फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवले. तर तिसऱ्या इसमाने फिर्यादी यांच्या गाडीच्या उघड्या दरवाजातून पाठीमागे ठेवलेली बारा लाख रुपये रोकड असलेली बॅग चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
