माजी मंत्री मखराम पवार यांचे निधन, भारिप बहुजन महासंघाचे पहिले आमदार
मुंबई : अकोल्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मखराम पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८४ वर्ष होते. मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचारादरम्यान रात्री १.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मखराम पवार हे प्रकाश आंबेडकरांचे माजी सहकारी होते. आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’च्या यशस्वीतेतील ते महत्त्वाचे शिलेदार होते. तसेच ते बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष होते. विलासराव देशमुखांच्या पहिल्या मंत्रिमंडळात मखराम पवार कॅबिनेट मंत्री होते. प्रकाश आंबेडकरांशी मतभेद झाल्यानंतर पवार यांनी काँग्रेस-भाजप-काँग्रेस असा राजकीय प्रवास केला आहे. मखराम पवार यांच्या पार्थिवावर उद्या अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या लोहगड या मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहे.
भारिप बहुजन महासंघाचे पहिले आमदार, माजी मंत्री मखराम पवार यांनी नंतरच्या कालावधीत बहुजनांची सत्ता यावी यासाठी जातीविरोधात भूमिका घेतली. त्यांनी किनवटच्या निवडणुकीत आदिवासींच्या बाजूने उभे राहून आपल्याच समाजाविरोधात प्रचार करून आदिवासी उमेदवार निवडून आणला. आंबेडकरी चळवळीसाठी ही नव्याने सुरूवात होती, अशा शब्दात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रकाश आंबेडकरांचा ‘भारिप’ स्थापनेनंतर राजकीय प्रवास काहीसा धीम्या गतीने सुरू होता. परंतु त्यांचा पुढे अकोल्याशी संबंध आला, अन राजकारणात त्यांच्या नेतृत्वाचे वारू चौफेर उधळायला लागले. नव्वदच्या दशकाची चाहुल लागत असतांनाच प्रकाश आंबेडकरांचा एका कार्यक्रमानिमित्ताने मखराम पवार यांचा अकोल्याशी संबंध आला.
प्रकाश आंबेडकर यांनी १९९०मध्ये अकोला पॅटर्न तयार केला होता. वंचित जाती, बाराबलुतेदार आणि प्रवाहाच्या बाहेर असलेल्या घटकांना राजकारणाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयोग प्रकाश आंबेडकरांनी केला होता. ‘अकोला पॅटर्न’ चांगलाच गाजला. या अकोला पॅटर्नच्या माध्यमातून त्यांनी मखराम पवार यांना किनवटमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आणि हा प्रयोग यशस्वी झाला. मखराम पवार विजयी झाल्याने ‘अकोला पॅटर्नची’ प्रचंड चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात मखराम पवार कॅबिनेट मंत्री होते.
भारिप बहुजन महासंघाचे पहिले आमदार, माजी मंत्री ज्यांनी नंतरच्या कालावधीत बहुजनांची सत्ता यावी यासाठी जातीविरोधात भूमिका घेतली पाहिजे हे नुसते शाब्दिक ठेवले नाही,तर किनवटच्या निवडणुकीत आदिवासींच्या बाजूने उभे राहून आपल्याच समाजाच्या विरोधात प्रचार करून आदिवासी उमेदवार निवडून आणला, pic.twitter.com/7JedREHaFy
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 8, 2021
