Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRA

ठाकरे सरकारडून हिंदू सणांना डावलण्याचा प्रयत्न – आमदार नितेश राणे

मुंबई : ममता बॅनर्जी दूर्गापूजेवर निर्बंध आणून हिंदू सणांचे महत्त्व कमी करत आहेत. त्याचप्रमाणे राज्यातले ठाकरे सरकार येथे गणेशोत्सवावर बंधने लादून हिंदू सणांचे महत्त्व कमी करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी रविवारी केला. ‘गणेशोत्सव तोंडावर आला आहे, कोकणात उत्सवासाठी कसे जायचे हे अजून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. गणेशोत्सवामुळे कोरोना पसरतो हे त्यांना कोणत्या कंपांऊंडरने सांगितले देव जाणे’, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यातल्या विविध गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार नितेश राणे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. गेल्या वर्षी ठाकरे सरकारने गणेशोत्सवावर असेच निर्बंध लादले होते. तीच नियमावली आता तारीख बदलून पुन्हा लादण्यात आली आहे. हिंदू आपले सण, उत्सव कसे साजरे करू शकणार नाहीत हे सरकार पाहात आहे. ही नियमावली पाळायची म्हणजे गणेशोत्सव अजिबातच साजरा करता येणार नाही. मोठ्या मूर्ती आणता येणार नाहीत. मिरवणुका काढता येणार नाहीत. आरती करता येणार नाही. मंडपाच्या आवारात जाहिरातीचे होर्डिंग, गेट लावता येणार नाहीत. गणेशोत्सवातला उत्साह कसा निकालात निघेल, याची पूर्ण काळजी या निर्बधांमध्ये घेण्यात आली आहे, असे राणे म्हणाले.


आता तर घरातल्या मूर्तीही सहा इंचांच्या असाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे. त्या विसर्जित करण्यासाठीही महापालिकेची पथके घरी जाणार आहेत. म्हणजे, ज्या काही लहानलहान मिरवणुका निघत होत्या ताही बंद करण्याचा नियोजनबद्ध डाव सरकारने आखला आहे. गणेशोत्सव साजरा करताना कोरोना होतो, असे सरकारचे म्हणणे आहे. काल बेस्टच्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते. तेथे झालेल्या गर्दीत कोरोना होत नाही. मेट्रोमधल्या गर्दीने कोरोना होत नाही. पार्ट्यांच्या गर्दीने कोरोना होत नाही. अजितदादांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन होते, तेव्हा होणाऱ्या गर्दीने कोरोना होत नाही. मात्र, गणेशोत्सवाने कोरोना होतो, असा ठाकरे सरकारचा दावा आहे, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे सरकार हिंदू धर्मियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये इतर धर्मियांचे सण झाले. परंतु त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आली नाही. कारण, त्यांच्यावर कोणतेच निर्बंध नव्हते. फक्त हिंदू धर्मियांच्या सणांवरच बंदी का? निर्बंध का, असा सवालही नितेश राणे यांनी केला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading