Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

भारतीय उच्चशिक्षण जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी दर्जेदार संशोधन व्हायला हवे –
डॉ.मुकुंद तापकीर

पुणे : पीएचडी मिळविल्यानंतर सर्व ज्ञान प्राप्त होते असे नाही. पीएचडी ही तर संशोधनाची सुरुवात आहे. संशोधन कधीही संपत नाही, तर त्यात प्रत्येक वेळेला बदल करता येतो.  महाविद्यालयीन शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयात संशोधन करायला हवे. जास्तीत जास्त आणि दर्जेदार संशोधनात चीन, अमेरिकेसारख्या देशांचा नंबर लागतो. भारतीय उच्चशिक्षण जागतिक पातळीवर पोहोचवायचे असेल तर देशाचे संशोधन किती आहे हे पाहिले जाते. त्यामुळे देशात दर्जेदार संशोधनाचे प्रमाण वाढायला हवे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे, पद्मश्री  विखेपाटील अध्यासन प्रमुख डॉ. मुकुंद तापकीर यांनी व्यक्त केले  

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्यावतीने अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मानव्यविद्या शाखेअंतर्गत मराठी विषयातील शाहिरी वाङ्मय यावर पीएचडी मिळवलेल्या  दिपाली बढे यांचा सन्मानपत्र आणि साडीचोळीचा आहेर देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगिता मावळे उपस्थित होते.

डॉ. मुकुंद तापकीर म्हणाले, शाहिरी परंपरेला अनेक वर्षांचा इतिहास आहे. देशाचा राष्ट्राभिमान जागवण्याचे काम शाहिरीने केले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक धन म्हणजे शाहिरी  परंपरा. लोकचळवळीचे एक महत्त्वाचे अंग म्हणून देखील शाहिरी कडे पाहिले जाते.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, पीएचडी करणाऱ्या शाहिरीतील अभ्यासकांची संख्या वाढणे गरजेचे आहे. अशा विद्वान मंडळींनी शाहिरी वाङमयावर विपूल लेखन केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिपाली बढे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रज्ञा काळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading