PMP – १५० इलेक्ट्रिक बसेसची १ कोटी कि.मी. धाव पूर्ण
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMP) च्या ताफ्यामध्ये माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये जीसीसी तत्वावर ९ मीटर नॉन- बीआरटी वातानुकूलित मिडी २५ ई-बस व माहे ऑगस्ट २०१९ मध्ये १२ मीटर बीआरटी वातानुकूलित १२५ ई-बस अशा एकूण १५० ई-बस दाखल झालेल्या आहेत. यामध्ये ९ मीटर मिडी ई-बसची ३२,१९,६४२ व १२ मीटर बीआरटी ई-बसची ६९,७२,८६९ अशी सर्व ई-बसची एकूण १,०१,९२,५११ कि.मी. इतकी धाव माहे जुलै २०२१ अखेर पूर्ण झालेली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ही ई-बसेसची १ कोटी कि.मी. धाव पूर्ण करणारी राज्यातील तसेच देशातील प्रथम सार्वजनिक वाहतूक संस्था ठरलेली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. मध्ये माहे मार्च २०२२ अखेर जीसीसी तत्वावर १२ मीटर बीआरटी वातानुकूलित ५०० ई-बस दाखल होणार असून भारतात पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ही ६५० इतका सर्वात मोठा ई-बसेसचा ताफा असणारी सार्वजनिक वाहतूक संस्था होणार आहे. यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए परिसरातील सर्व नागरिक, आयटी व औद्योगिक क्षेत्राला याचा उपयोग होणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. प्रवाशांच्या हितासाठी, शहरातील प्रदुषण कमी होण्यासाठी ऑटो ट्रान्समिशन, वातानुकुलित १२ मीटर बीआरटीयुक्त ई-बसेस व सीएनजी बसेसच्या संचलनाव्दारे सदैव प्रयत्नशील आहे.
