दुर्मिळ आजार असलेल्या वेदिका शिंदे ने घेतला अखेरचा श्वास; 16 कोटींचे दिले होते इंजेक्शन
पिंपरी : भोसरी येथील वेदिका सौरव शिंदे हिच्या वडिलांनी व कुटुंबीयांनी तिला झालेल्या दुर्मिळ आजारातून बरे होण्यासाठी लोकवर्गणीतून तब्बल १६ कोटी रुपये जमवले होते. व तिला इंजेक्शन दिले होते. पण आज सायंकाळी अचानक ती खेळत असताना तिला श्वासाचा त्रास झाला. तिच्या उजव्या लँग्ज मध्ये श्वास घेण्यास त्रास झाला व तिला तिच्या पालकांनी पटकन खाजगी रुग्णालयात हलवले. ती तब्बल एक तास मृत्यूशी झुंज देत होती. डॉक्टर शक्य तेव्हडे प्रयत्न करत होते, पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही व त्या चिमुकल्या जिवाने अखेरचा श्वास घेतला.
११ महिन्यांच्या वेदिका सौरभ शिंदे (Vedika Shinde) हिला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप-वन हा दुर्मिळ आजार झाला होता. काहीच दिवसांपूर्वी वेदीकाचे वडील सौरव शिंदे यांनी व वेदीकाचे आई व आजोबांनी तिच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन बाहेर देशातून मागवण्यासाठीचे आवाहन जनतेकडे केले होते. त्यांच्या आवाहनाला साद देत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व सर्वच थरातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला.
प्रसार माध्यमातूनही मदतीचे आवाहन केले होते.वेदीकासाठी शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही इंजेक्शनची कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी व मदतीसाठी लोकसभेत आवाज उठवला. व पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकार ला मदतीचे आवाहन केले होते. व त्या इंजेक्शनची कस्टम ड्युटी माफ करून घेतली. तब्बल १६ कोटी ही अशक्यप्राय रक्कम लोकवर्गणीतून जमा झाली . आणि इंजेक्शन भारतात आले. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर इंजेक्शन देऊन पुढील उपचार घेऊन वेदिका पूर्ण बरी होऊन घरी आली होती.
सगळे व्यवस्थित सुरू आहे असे वाटत असतानाच आज खाजगी रुग्णालयात वेदिका ने अखेरचा निरोप घेतला . ही बातमी समजताच सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
काय आहे स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी
स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी (SMA) हा दुर्मिळ आजार आहे. ह्या आजारात व्यक्तीमध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी जो जीन असणे अपेक्षित असते तो नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मज्जातंतू आणि स्नायू बळकटीकरणाची प्रक्रिया ही मंदावते. परिणामी अन्न गिळणे, श्वास घेणे, त्याशिवाय हालचाली करणे या सर्व गोष्टींवर बंधने येऊ लागतात आणि परिस्थिती गंभीर होत जाते.
