Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRA

माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन

सोलापूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार , अणदूर गावचे सुपुत्र सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांचे आज पहाटे सोलापूर येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.

१९८० ते १९८५ या काळात ते तुळजापूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते . साधी राहणी , उच्च विचारसरणी ही त्यांची खासियत होती . मराठवाड्यातले साने गुरुजी म्हणून त्यांना ओळखले जात असे . अणदूर येथे शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी गोरगरीब मुलामुलींना शिक्षणाची दारे खुली केली होती. अणदूरचे जवाहर विद्यालय हे त्यांनीच स्थापन केलेले ज्ञानमंदिर . हे विद्यालय मराठवाड्यात गुणवत्तेत अग्रेसर आहे .आलुरे गुरुजींवर साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव होता. गांधी टोपी , नेहरु शर्ट , धोतर असा त्यांचा साधा पेहराव होता.

तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे ते माजी अध्यक्ष होत . सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदही त्यांनी भूषविले होते. आलुरे गुरुजींच्या निधनाने शिक्षणावर अनन्यसाधारण निष्ठा असलेला तत्वनिष्ठ राजकीय नेता काळाने हिरावून नेला आहे . ते काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जात . आलुरे गुरूजी गेल्यामुळे जुन्या पिढीतील दुवा निखळला आहे. सोलापूरच्या अनेक सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता . शिक्षणातून त्यांनी समाजाचा उद्धार केला .त्यांच्या निधनाने तुळजापूर तालुक्यावर, अणदूर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर अणदूर ( ता. तुळजापूर ) या त्यांच्या गावी आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading