काँग्रेस पक्षाचे कार्यालय सचिव उत्तमराव भूमकर यांचे निधन
पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय सचिव उत्तमराव भूमकर यांचे आज दु. ४ वा., काँग्रेस भवनमध्ये हृदय विकाराच्या झटक्याने दुख:द निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते
उद्या २ ऑगस्ट २०२१ रोजी ते ८३ व्या वर्षात पर्दापण करणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नु. म. वि. मध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर १९६० ते १९६८ पर्यंत त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. महाराष्ट्र हरिजन सेवक संघ, युवक क्रांती दल यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलनामध्ये व मोर्चामध्ये भाग घेतला व जेलमध्येही गेले. १९७९ च्या मनपा निवडणुकीनंतर ते शिक्षण मंडळ येथे सदस्य झाले व सन १९७९-८० शिक्षण मंडळाचे उपाध्यक्षही होते. त्यावेळी ते नागरिक संघटनेत होते. १९८० साली ते काँग्रेसमध्ये आले. त्यावेळचे अध्यक्ष प्रकाश ढेरे व खासदार बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी सुचविल्याप्रमाणे ते काँग्रेस भवनमध्ये कार्यालय सचिव म्हणून काम करीत होते.
सन १९९७ साली त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. ज्येष्ठ नागरिक संघामार्फत त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने व ज्येष्ठांसाठी आनंद मेळावे घेतले होते. काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन कामकाज अतिशय चोखपणे करायचे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होणाऱ्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियानाच्या तयारीसाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. त्यांनी आपला अखेरचा श्वास काँग्रेस भवनमध्येच घेतला. त्यांच्या अकस्मित निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक निष्ठावंत कार्यकर्ता व नविन पिढीला मार्गदर्शन करणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व गमवले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड डॉ. श्रीपाल सबनीस, कमल व्यवहारे, सुलभा भोंडवे व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला शोक व्यक्त केला.
