झिका – पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावात आढळला महाराष्ट्रातील पहिला रुग्ण
पुणे : करोनाच्या विळख्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच आता झिका नावाच्या नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. महाराष्ट्रातील झिकाचा पहिला पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात सापडला आहे. त्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. झिका वायरसपासून बचाव करण्यासाठी अजून कोणतही औषध उपलब्ध नाहीये. स्वत:ला डासांपासून दूर ठेवणे हा एकमेव झिका वायरसचा धोका टाळण्याचा उपाय आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थे समोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.
बेलसरमध्ये मागील एक ते दिड महिन्यापासून डेंग्यू चिकनगुनिया आणि इतर साथीच्या रोगांनी थैमान घातले होते. त्याच अनुषंगाने एनआयव्ही (National Institute of Virology) पुणे यांनी बेलसर(ता.पुरंदर) मधील काही 51 रक्त नमुने गोळा करून ते तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये प्रमुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण असल्याचे आढळून आले. तसेच 25 चिकनगुनिया तर 3 डेग्यू चे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बेलसर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास आज (31जुलै ) भेट देत पाहणी केली. जिल्हा आरोग्य विभाग बेलसर मध्ये दाखल झाला आहे. तसेच या विषाणूस कोणीही न घाबरता काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, 1947 मध्ये झिका विषाणू सर्वप्रथम आफ्रिका आणि एशिया मध्ये आढळून आला होता. विषाणूमुळे ब्राझीलमध्ये नवजात बालकांच्या मेंदूवर मोठा परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे ताप,सांधेदुखी,अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे, शरीरावर लाल रंगाचे चट्टे येणे इत्यादी लक्षणे दिसताच डॉक्टरकडे जाण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
