आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : राज्यात एकीकडे शहरीकरण वाढत असताना आदिवासी समाजाने आपले मातीशी असलेले नाते जपले आहे. मुंबईतील आरेचा ८०८ एकर परिसर जंगल घोषित झाल्याने येथील स्थानिक आदिवासींना सर्वाधिक आनंद झाला आहे. येथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी ज्या मूलभूत सोयीसुविधा उभारणे गरजेचे आहे, त्या सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. आदिवासी बांधवांच्या उन्नतीकरिता शासन कटिबद्ध असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप द्यायला सांगितल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

 

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक अन्नधान्य किट वाटपाचा शुभारंभ श्री ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याप्रसंगी आरे कॉलनीतील खांबाचा पाडा येथील ५२ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार गजानन कीर्तीकर, आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण आदी उपस्थित होते. खावटी अनुदान हे चार हजार रुपयांचे असून त्यात दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू आणि दोन हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ठाकरे म्हणाले, खावटी अनुदान वाटप हे आपले कर्तव्यच आहे. तथापि आरे मधील जंगल वाचविले त्याचबरोबर येथील आदिवासींच्या उन्नतीसाठी काम करणे गरजेचे आहे. यासाठी वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून नियोजन केले जाईल.

वातावरणीय बदलांमुळे जगभर पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. महाराष्ट्रातही आपण विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत आहोत. अनेक ठिकाणी दरड कोसळून अपघात होत आहेत. त्या अनुषंगाने जेथे आवश्यक आहे तेथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तथापि, कमी वेळात अधिक पाऊस पडत असल्याने रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आदिवासींनी स्वतःच्या शेतात पिकविलेल्या भाज्या तसेच तारपा वाद्य देऊन मंत्री श्री. ठाकरे यांचे स्थानिकांमार्फत स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: