राजकीय पक्ष म्हणजे घटस्फोटीतांचा आसरा, रोज नवा जावई इथे रोज नवा सासरा : रामदास फुटाणे

पुणे : आयुष्यात वेगळे काहीतरी करण्याची प्रेरणा पुस्तक वाचनातूनच मिळाली.पुस्तक वाचनातून निर्माण होणारे मन आणि संवाद स्वत:तील कार्यक्षतमा वाढविण्यास उपयुक्त ठरते. बालसाहित्याकडे दुर्लक्ष झाले हे वास्तव आहे, पण काही मंडळी सध्या या क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. सकस साहित्याच्या माध्यमातून बालमनावर चांगले परिणाम घडविण्याची जबाबदारी बालसाहित्याची निर्मिती करणार्यांवरच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी केले. राजकारणातील दलबदलुंवर सगळे राजकीय पक्ष म्हणजे घटस्फोटीतांचा आसरा, रोज नवा जावई इथे रोज नवा सासरा अशा शब्दांत फुटाणे यांनी मार्मिक टिप्पणी करताच उपस्थितांनी मनमुराद दाद दिली.

मुलांच्या क्षेत्रात कार्यरत राहून वाचनसंस्कृती वाढविणार्या संस्थांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने अक्षरसेवा पुरस्कार रामदास फुटाणे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन व्यासपीठावर होते. 


विनोद शिरसाट (साधना, बालकुमार दिवाळी अंक), किरण केंद्रे (किशोर मासिक, बालभारती), डॉ. गीताली टिळक (छावा मासिक), श्रुती पानसे (चिकूपिकू मासिक), सुनिता जोगळेकर (निर्मळ रानवारा मासिक) यांचा अक्षरसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिरसाट यांच्या वतीने गोपाळ नेवे, टिळक यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार स्वप्निल पोरे तर जोगळेकर यांच्या वतीने ज्योती जोशी व स्नेहल मसालिया यांनी पुरकार स्वीकारला.

पुण्यातील बालवाचनालय चालविणार्या संस्थांना या निमित्ताने पुस्तके (अक्षरभेट) भेट देण्यात आली. यात प्रसाद भडसावळे, निरजा जोशी, नरहरी पाटील यांचा समावेश होता.

प्रशांत जगताप म्हणाले, ज्या वयात मुले वाचन करताना, मैदानावर खेळताना दिसायला पाहिजे त्या वयात ही मुले सोशल मीडियात अडकलेली पाहायला मिळत आहेत. या गोष्टीला आपण सर्वजण जबाबदार आहोत. बालसाहिच्या क्षेत्रात नियतकालिकांच्या माध्यमातून सुरू असलेला उपक्रम निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. पुस्तकेच आयुष्य बदलू शकतात हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणावरून नमूद केले. बालसाहित्यासाठी वाहून घेतलेल्या नियतकालिकांना शासकीय जाहिराती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी आश्वासन दिले. पुरस्कारार्थींना त्यांनी आर्थिक मदत जाहीर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले तर आभार मिलिंद बालवडकर यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: