त्रिशरण एनलाईटनमेंट फाउंडेशनचा प्रियजनांच्या आठवणीसाठी अनोखा उपक्रम

पुणे : कोरोनामध्ये आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांना “त्यांची” आठवण म्हणून एका झाडाचे रोप भेट देण्याचा कृतिशील उपक्रम पुण्यात त्रिशरण एनलाईटनमेंट फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे यांनी दिली.

येरवड्यातील सिद्धार्थ नगर रामवाडी परिसरातील कोरोनाने घरातील व्यक्ती गमावलेल्या कुटुंबीयांची प्रज्ञा वाघमारे यांनी भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांना भावनिक आधार देत त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कुटुंबातील गमावलेल्या प्रिय जनाची आठवण म्हणून त्यांना एक झाडाचे रोप भेट देण्यात आले. या रोपाचे आपल्या दारात जतन करून आपल्या गमावलेल्या व्यक्तीला अभिवादन करावे अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.


यानिमित्ताने भेट दिलेल्या कुटुंबांची संवाद साधताना अनेकांना अश्रू अनावर झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जीव गमावले. ज्या कुटुंबावर हे संकट ओढवले त्यांना दुःखा सोबतच अनेक वाईट अनुभव देखील आले. “ना भेटी साठी, ना सांत्वन करण्यासाठी कोणीच नाही, नातेवाईकांसह जवळच्यांनी देखील यावेळी पाठ फिरवली. केवळ कुटुंबातील सदस्य आणि अश्रू यांच्या सोबतच दुःखाचा डोंगर अजूनही समोर उभा आहे. संस्थेने भेट दिल्यावर कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना अश्रू अनावर झाले.


संस्थेच्या वतीने कोरोना मध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबांची माहिती घेऊन त्यांना शासकीय योजना तसेच इतर आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रज्ञा वाघमारे यांनी यावेळी दिली. यामध्ये प्रामुख्याने विधवा महिला, बालके व जेष्ठ नागरिक यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यभरातील विकासदूतांच्या माध्यमातून “एक आठवण आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला समाजातील विविध घटक तसेच कोरोनामध्ये कुटुंबातील सदस्य गमवलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: