शिल्पकार नवीन गोष्टी घडवतो, तोडत नाही रूपाली चाकणकर यांचा फडणवीस यांना टोला

शिल्पकार नव्या पुण्याचे होर्डिंग्ज वरून देवेंद्र फडणवीस ट्रोल

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. पुणे शहरात फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवरून फडणवीसच ट्रोल झाले आहेत. कारण या होर्डिंग्सवर फडणवीसांचा उल्लेख ‘शिल्पकार नव्या पुण्याचे, नेतृत्त्व नव्या महाराष्ट्राचे’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता सोशल मीडियावर टीका होत असून नेटकऱ्यांनी या होर्डिंगचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, ज्यांनी काही दिवसांपासून महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील माणसाला तोडण्याचं,खच्चीकरण करण्याचे काम केलंय त्यांना शिल्पकार म्हणवून घेण्याचा काही अधिकार नाहीये. शिल्पकार नवीन गोष्टी घडवतो ,तोडत नाही.
यांचे नवे पुणे घडवण्यापाठीमागे तेवढंच योगदान आहे जेवढे वेगळा विदर्भ करण्यामागे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय, ‘आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही. धन्य ते नेतृत्त्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त.’ तसेच एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘पुण्य नगरीसाठी शुन्य नेतृत्त्व आहे, महापौरांनी बॅनरबाजीसाठी वेगळचं बजेट काढलेलं दिसतंय, तयारी महानगरपालिकेची.’ तर दुसऱ्याने लिहले आहे, ‘पोस्टर बघून फडणवीसांनाही हसू येत आहे.’

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी केले आहे. तसेच ज्यांना फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहनदेखील पक्षातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात होर्डिंग लावणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Leave a Reply

%d bloggers like this: