Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

प्रगतीशील राजकारण आणि संस्कृती यांची सांगड घालण्यात विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावू शकतात : न्या.डॉ.धनंजय चंद्रचूड 

 पुणे – भारताचे भूतपूर्व सरन्यायाधीश  कै. य.वि. चंद्रचूड यांच्या दृष्टीने दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. एक म्हणजे   शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करणे व विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि दुसरे भारतीय राज्यघटना यांचा अभ्यास करणे. भारत आणि जगभरातील अनेक समाजसुधारक जसे डॉ.  बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, नेल्सन मंडेला यांच्यामुळे आज शिक्षणाचा विशेषाधिकार आपल्यास मिळाला आहे. त्यामुळेच प्रगतीशील राजकारण आणि संस्कृती यांची सांगड घालण्यात विद्यार्थी  महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले. 

शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे भारताचे भूतपूर्व सरन्यायाधीश कै.य.वि. चंद्रचूड यांच्या स्मरणार्थ आॅनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी  ‘विद्यार्थी – भारतीय घटनेचे बिनीचे शिलेदार’ या विषयावर यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित, महाराष्ट्र राज्याचे अ‍ॅड. जनरल आशुतोष कुंभकोणी, विवेक फणसाळकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर, नितीन ठक्कर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष  अ‍ॅड. सदानंद फडके, शि.प्र.मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सोहनलाल जैन, नियामक मंडळ उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे सहभागी झाले होते. 

डॉ. धनंजय चंद्रचूड म्हणाले, शालेय आणि महाविद्यालयीन जीवन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करते. त्यामुळेच अस्तित्त्वात असलेल्या प्रणाली आणि पदानुक्रमांवरही विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात. भारताची राज्यघटना आपल्याला हक्क आणि व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील देते.

उदय ललित म्हणाले, कै. य.वि. चंद्रचूड हे एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाचे आणि दूरगामी परिणाम होणारे निकाल दिले. सामाजिक समस्यांविषयी त्यांना सखोल जाणीव होती, हे त्यांच्या कायार्तून दिसून येते. न्यायदानातील त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. आपल्या उल्लेखनीय कार्यातून त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला देखील मार्ग दाखविला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

अ‍ॅड.एस. के. जैन म्हणाले, आपल्या न्यायदानाच्या कायार्तून चंद्रचूड यांनी मूलभूत हक्काचा पुरस्कार केला. तरुण वकीलांकरिता ते मित्र आणि मार्गदर्शक होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी न्यायदानाचे अतुलनीय कार्य केले आहे. या चर्चासत्रात प्रा. स्वर क्रांती आणि प्रा. सुजाता नटराजन यांनी समन्वयक म्हणून काम पहिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading