जागरूक काँग्रेस राज्यघटनेत बदल होऊ देणार नाही – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

पुणे : “सर्व जातीधर्मातील लोकांना समान वागणूक देणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे काँग्रेस पक्षाने आजवर संरक्षण केले आहे. अलीकडच्या काळात राज्यघटनेमध्ये छेडछाडीचे काही प्रयत्न होत आहेत. मात्र, काँग्रेस पक्ष राज्यघटनेबाबत जागरूक असून, राज्यघटनेत कोणताही बदल आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही कायम पार पाडू,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव दिवंगत डॉ. विकास आबनावे यांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांच्या नावाने स्थापण्यात आलेल्या ‘डॉ. विकास आबनावे फाउंडेशन’चे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, संस्थेचे मानद अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, संचालक प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, दिलीप आबनावे, गौरव आबनावे, राजेश आबनावे, शिरीष आबनावे आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे यांच्या हस्ते फाउंडेशनच्या लोगोचे अनावरण आणि संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “वंचित समाजातील आबनावे परिवाराने शैक्षणिक संस्था उभारून शिक्षणाचे दालन उघडे केले, हे मोलाचे कार्य आहे. डॉ. विकास आबनावे यांनी आपल्या दूरदृष्टीने काम करत  या संस्थेला नावारूपास आणले. समाजिक, राजकीय चिंतनाला आध्यात्मिक विचारांची जोड त्यांनी दिली. डॉ. विकास यांच्या माघारी प्रसाद आणि संपूर्ण आबनावे कुटूंब या संस्थेचे काम बघत आहे, हे चित्र सुखावणारे आहे. एका कुटुंबाने एकत्र येऊन काम करणे कौतुकास्पद आहे. जातीच्या पलीकडे जाऊन शिक्षण देत पिढी घडवण्याचे मोलाचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही संस्था करत आहे. फाऊंडेशनच्या रुपात लावलेले हे रोपटे एक दिवस वटवृक्ष होईल याची मला खात्री आहे.”

उल्हास पवार म्हणाले, “एका संस्थेत तेवढ्याच श्रध्देने चार पिढ्या कार्यरत आहेत हे कौतुकास्पद आहे. डॉ. विकास यांचे आणि माझे मैत्रीचे, जिव्हाळ्याचे नाते होते. विकास हा जबरदस्त अभ्यास, अफाट वाचन, शौर्य वृत्ती, कुठलीही खंत व्यक्त न करता सतत काम करणारा सच्चा कार्यकर्ता होता. फाउंडेशनची निर्मिती करून त्यांच्या मनातल्या संकल्पना साकारण्यासाठी संस्थेने घेतलेले कष्ट मोलाचे आहे.” रामदास फुटाणे यांनी आबनावे कुटुंब अनेक पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. त्याचे फळ आगामी काळात आबनावे मिळावे, अशी भावना व्यक्त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: