डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समिती(अंनीस)चे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीनातून तात्पुरता दिलासा दिला आहे. भावेच्या वडिलांचे रत्नागिरी येथे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यविधींसाठी जाण्याची परवानगी आज हायकोर्टाने दिली आहे.

दरम्यान, 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात डॉ. दाभोलकर यांची सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयनं आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर या दोघांना घटनास्थळाची रेकी करण्यासाठी आणि गुन्हा केल्यानंतर तिथून फरार होण्यासाठी विक्रम भावेनंच मदत केली होती असा आरोप तपासयंत्रणेनं ठेवला आहे. हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम पाहणारा अशी विक्रम भावेची ओळख आहे. मागील दोन वर्षापासून सीबीआयच्या केसमध्ये विक्रम भावे अटकेत होता.

यापूर्वी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानंच भावेला एक लाख रुपयांचा व्यक्तिगत जामीन मंजूर केला होता. मात्र हा जामीन मंजूर करताना अनेक अटी घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर रत्नागिरीला जाण्यासाठी विक्रम भावेने हायकोर्टाकडे परवानगी मागत अर्ज दाखल केला होता.

 

Leave a Reply

%d bloggers like this: