fbpx
Thursday, May 2, 2024
Latest NewsPUNE

गरजूंना मदत नव्हे ; बंधुत्वाचे नाते जपणारी भेट

पुणे : आपण सर्वजण भारत मातेची मुले आहोत. त्यामुळे समाजात आपण बंधूभावाने रहायला हवे. कोणी आर्थिकदृष्टया सबल आहे, तर कोणी दुर्बल आहे. कोविडसारख्या वैश्विक आपत्तीच्या काळात मदत देऊन कोणी कोणावर उपकार करीत नाही. गरजूंना दिलेली ही मदत म्हणजे बंधुत्वाचे नाते जपणारी भेट आहे. अशी आपुलकीची भेट देण्याची ताकद परमेश्वर प्रत्येकाला देवो, अशी भावना जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष माधव माटे यांनी व्यक्त केली.
जनता बँक स्टाफ वेल्फेअर सोसायटी, पुणे तर्फे समाजातील चर्मकार, नाभिक, पौरोहित्य करणारे, कलाकार, वादक व डेÑपरी शिवणारे कारागिर अशा ५१ कुटुंबांना शुक्रवार पेठेतील भारत भवन येथे झालेल्या कार्यक्रमात आपुलकीची भेट – जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.  यावेळी इस्कॉनचे उपाध्यक्ष संजय भोसले, जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, महाव्यवस्थापक जगदीश कश्यप, सोसायटीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रसाद पोटभरे, रुपेश नाईक,विजय फाटक, अभय ढमाले, नयन माने, अविनाश निरगुडे आदी उपस्थित होते.
संजय भोसले म्हणाले, गरजूंना मदत देण्याची नव्हे, तर प्रेमाची भावना प्रत्येक दानशूर व्यक्तीमध्ये असते. आपल्यामधील दु:खाचे मूळ कारण हे परमेश्वराचा विसर पडणे हे आहे. संतांनी आपल्याला प्रेमाची भावना शिकविली आहे. सामाजिक कार्यातून संवेदनशीलता आणि अध्यात्मातून आपल्याला तन्मयता मिळते. धर्मग्रंथाच्या प्रत्येक पानावर प्रेमाचा संदेश दिलेला आहे, कोठेही द्वेषाचे विष नाही. परंतु चांगल्या गोष्टी व विचार आज शिकविले जात नाही. आपुलकीची भेट सारख्या उपक्रमांमधून हा संदेश दिला जात आहे.
किशोर चव्हाण म्हणाले, जनता बँकेतील कर्मचा-यांनी सामाजिक दायीत्वाच्या भूमिकेतून आपुलकीची भेट हा उपक्रम राबविला आहे. यापूर्वी अनेकदा अशा प्रकारची मदत व प्रत्यक्ष आर्थिक निधी देखील मदत म्हणून दिला आहे. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न आम्ही सोसायटीच्या माध्यमातून करीत आहोत. यापुढेही असेच उपक्रम राबविले जातील, असेही त्यांनी सांगितले. शरद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading