कोविड योद्धांच्या निस्वार्थ कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा -प्रशांत दिवेकर

पुणे : कोरोनाच्या दोन्ही लाटेंच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशालाच वेठीस धरले. जीवनमान व आर्थिक परिस्थिती दोलायमान झाली. कोविडच्या दुसऱ्या लाटेने समाज मनावर प्रचंड मोठा आघात केला. नैराश्य व भीतीपुर्ण वातावरण असतांना अनेक युवक कोविड योद्धा रूपात समोर आले. प्रत्यक्ष कोविड सेंटर वर , प्लाझ्मादान , रक्तदान, बेड उपलब्धता यांसारख्या अनेक आघाडींवर अहोरात्र निस्वार्थपणे काम केले. अशा सर्व कोविड योद्धांचा सन्मान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभाविप पुणे जिल्हाच्या वतीने रविवारी रोजी मनोहर सभागृह , ज्ञानप्रबोधिनी येथे करण्यात आला. ज्यामुळे कोविड योद्ध्यांना समाजकार्य करण्याचे पाठबळ मिळाले.

अभाविपच्या स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात सामुहिक गीत व प्रतिमा पुजन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभाविप जिल्हा संयोजक गौरव वाळुंजकर यांनी केले. महाराष्ट्र प्रांत सहमंत्री अनिल ठोंबरे यांनी अभाविप मांडणी करतांना अभाविपच्या शैक्षणिक , सामाजिक व सांस्कृतिक पैलूंवर विश्लेषणात्मक संबोधन केले. यानंतर कोविडच्या काळात समाजात उतरून कार्य करणार्या समाजरत्नांचा , संघठनांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रशांतजी दिवेकर यांनी युवा कोविड योद्धांच्या पाठीवर कौतुकांची थाप मारतांना त्यांच्या निस्वार्थ कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हा फक्त ठराविक युवकांचा सन्मान नसून हा संपुर्ण समाजाचा बहुमान आहे , असेच अखंड कार्य करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. कार्यक्रमाचा समारोप अभाविप प्रांत संघठनमंत्री अभिजीतजी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरमने झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैष्णवी दांडगे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: