Friday, September 4, 2026
Latest NewsPUNE

संस्कृती आणि प्रकृती यांच्यातील संघर्ष हा नवनिर्मीतीचा गाभा – डाॅ. सदानंद मोरे

पुणेः- मानव संस्कृती आणि निसर्ग प्रकृती हे दोन्ही घटक एकमेकांशी तादात्म्य पावलेले असून संस्कृती आणि प्रकृती यांच्यातील संघर्ष हा नवनिर्मीतीचा गाभा राहिलेला आहे. मानव संस्कृतीने निसर्ग प्रकृतीशी इतर नैसर्गिक घटकांप्रमाणे जुळवून न घेता उलट
त्याच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला तर मानवजातच संकटात येईल, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य,संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून कालिदास यांनी रचलेल्या ऋतुसंहार या संस्कृत काव्याचा मराठीतील अनुवाद ‘ऋतुसंहार…एक रसानुवाद’ या डाॅ. ज्योती रहाळकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होेते.

यावेळी व्यासपीठावर सिग्नेट पब्लिकेशन्सचे अॅड.प्रमोद आडकर, ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डाॅ. सदानंद मोरे म्हणाले, निसर्ग हा नवसृजनाचे रुप आहे, त्याच प्रमाणे श्रुंगाररस हा देखील नवनिर्मीतीचाच एक भाग आहे. मानव प्राण्याने निसर्गापासूनच प्रेरणा घेऊन, ऋतुचक्रापासून प्रेरीत होऊन त्याच्या भाव-भावनांना काव्यात गुंफले आहे. निसर्गातील सृजन हा स्थायीभाव आणि श्रृंगार या स्थायीरसाचे गारुड घेऊन संस्कृत काव्यनिर्मीती झालेली दिसून येते. ज्ञानेश्वरांच्या निसर्गवर्णनात ते कामभावना, रतीच्या मस्तकावर पाय देऊन शांत भाव देऊ पाहतात. महाकवि कालिदासांनी ज्या पद्धतीने निसर्गापासून प्रेरणा घेऊन त्यातून श्रृगांर साहित्य निर्मिती केली त्याच निसर्गापासून प्रेरणा घेऊन ज्ञानेश्वरांनी शांत रसाची निर्मिती केली. या अर्थाने ज्ञानेश्वर कालिदासांच्या काव्यप्रतिभेला आवाहन देतात आणि निसर्ग म्हणजे केवळ श्रृगांर या भावने पेक्षा खुप पुढे जाऊन ज्ञानेश्वर आपणांस त्यांच्या काव्यातून निसर्ग उलगडतांना दिसतात. कवी मनाला श्रृंगार रसही हवा आहे आणि ज्ञानेश्वरांचा शांत रसही हवा आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वभावनुसार आणि मानसिक स्थितीनुसार त्या त्या भावनेला त्याच्या परिप्रेक्षांतून प्रतिसाद देत असतो.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,कवी कालिदास नित्यनूतन आहेत. त्यांच्या समग्र साहित्यात निसर्ग केंद्रस्थानी आहे. ऋतुसंहार काव्यात निसर्गाचा जीवनपटच आहे. कालिदासांना मानवी भाव भावनांचे प्रतिबिंब निसर्गात दिसले. निसर्ग ही नुसती पाहण्याची वस्तू नसून निसर्गाच्या विविध भावांचे मानवी भावभावनांशी संबंध आहेत अशी त्यांची धारणा होती. निसर्ग वर्णनाला पुढील संस्कृत साहित्यात जो एक सांकेतिकपणा आणि यांत्रिकपणा आला तो कालिदासांच्या साहित्यात नव्हता. विद्वत्ता आणि कलात्मकता, सौंदर्यासक्त दृष्टी, निसर्गभान आणि जीवनाकडे पाहण्याची खेळकर व आनंदी वृत्ती यांचा संगम कालिदासांच्या व्यक्तिमत्वात आणि साहित्यात दिसतो. जीवनातली कटुता, भीषणता आणि रौद्ररूप पाहणे त्यांनी टाळले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading