Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

इंधन दरवाढ मागे घ्या अन्यथा कामगार व शेतकरी तीव्र आंदोलन करतील – डॉ. कैलास कदम

पिंपरी : केंद्रातील भाजपाप्रणित मोदी सरकारने मागिल सात वर्षात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल शंभरी पार झाले असून दररोज गॅसच्या किंमती वाढतच आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना, शेतक-यांना, कष्टकरी कामगारांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ लागली आहे. वाढत्या महागाईमुळे रोजगार संपुष्टात येत असून बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामिण भागातही गुन्हेगारी वाढत आहे. या मोदी सरकारने डिझेलवर 820 टक्के, पेट्रोलवर 258 टक्के एक्साईज ड्यूटी आणि 18 रुपये रस्ते विकास सेस 4 रुपये कृषी विकास सेस लावला आहे. सर्व सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. हि महागाई व इंधन दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा कष्टकरी कामगार व शेतकरी आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला.

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. 8 जुलै) इंटकच्या वतीने आकुर्डीत तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले. यानंतर आकुर्डीतील तहसिल कार्यालयापासून पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नंतर सभेत रुपांतर झाले. यावेळी अमित मेश्राम, विश्वास गजरमल, नरेंद्र बनसोडे, डॉ. वसिम इनामदार, उमेश खंदारे, कौस्तुभ नवले, भारती घाग, आंनदा फडतरे उपस्थित होते. 

डॉ. कैलास कदम पुढे म्हणाले की, पेट्रोल, डिझेलवरील करामधून मागील 7 वर्षात तब्बल 22 लाख कोटी रुपयांची नफेखोरी केंद्र सरकारने केली आहे. करांशिवाय पेट्रोलची किंमत 32 रुपये आणि डिझेल 33 रुपयांपर्यंत प्रतिलिटर मिळाले पाहिजे. भरमसाठ करामुळे पेट्रोल, डिझेल शंभरीपार झाले आहे. तर एलपीजी सिलेंडर सुध्दा 850 रुपयांच्या पुढे गेला आहे. खाद्य तेलाचे भावही 200 रुपये लिटर आणि डाळींचे भाव देखिल प्रचंड वाढले आहेत. एकीकडे बेरोजगारी तर दुसरीकडे महागाई या दुष्टचक्रात सर्व सामान्य जनता भरडली जात आहे. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी इंधन दरवाढ व अतिरिक्त कर मागे घ्यावेत अन्यथा कष्टकरी कामगार शेतकरी आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading