राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त होणार राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुणे : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची आणखी एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने दि. ७ जुलै २०२१ रोजी २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण करण्याचा कार्यक्रम मंगळवार, दि. १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मयूर कॉलनीमधील मएसो ऑडिटोरीअम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC हे आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्धाटन व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर AVSM, VSM (Deputy Chief of Integrated Defence Staff (Medical)) व ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) हे या समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभाचे प्रक्षेपण फेसबुक आणि ‘मएसो’च्या युट्यूब चॅनेलद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आभासी पद्धतीने या समारंभात सहभागी होता येणार आहे …
https://www.youtube.com/watch?v=2taN2FqpvEM
https://www.facebook.com/100973985597451/posts/101884895506360/

ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच NCC चा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी होणार आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या समारंभाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे आणि सैनिकी शाळेच्या शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे यांनी ही माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते उपस्थित होते.
“सभ्य आणि समर्थ समाजनिर्मितीसाठी महिलांचे सक्षमीकरण अतिशय महत्वाचे ठरते, म्हणूनच महिलांचे शिक्षण व सक्षमीकरणासाठी ‘मएसो’ सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे. आजमितीस सुमारे २० हजार विद्यार्थिनी संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आज देशाच्या सशस्त्र सेनादलांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थिनींनी जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे,” अशी माहिती आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली. 
“शाळेतील स्वावलंबी जीवनशैली, नियमितपणा, शिस्त, संस्कार, विविध उपक्रमांमुळी विस्तारणारा दृष्टिकोन या सर्वांचा अतिशय सकारात्मक परिणाम विद्यार्थिनींवर होतो. त्यामुळे त्यांच्यात अन्य शाळांमधील विद्यार्थिनींच्या तुलनेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. शाळेत मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि प्रशिक्षणाच्या जोरावर आमच्या सैनिकी शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींनी सशस्त्र सेनादलांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अन्य क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थिनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे,” असे डॉ. मेहेंदळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
“शाळेतील शिक्षण व प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींची बौद्धिक, मानसिक आणि शारिरीक जडणघडण अतिशय उत्तमरितीने होते. त्यामुळेच त्या सशस्त्र सैन्यदलांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या परिक्षांप्रमाणे अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. शाळेतील विद्यार्थिनींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमधील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले तर त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल,” असे शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: