देवदासी आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांचे अखेर कोविड लसीकरण सुरु

पुणे : ‘कोरोना’चा सर्वाधिक फटका बसलेल्या व समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या देवदासी आणि देहविक्रय करणा-या महिलांसाठी लसिकरण मोहिम राबविण्यात येत आहे. बुधवार पेठ भागातील हकमचंद नथुभाई गुजराथी या महापालिकेच्या शाळेमध्ये सिंहगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने लसीकरण करण्यात आले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांच्या सहकार्याने हे कोविड लसीकरणक केंद्र सुरु करण्यात आले.
बुधवार पेठेतील या वस्तीत पाहिल्यांदाच लसीकरण होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या महिलांना लस देण्यात आली. डॉ. नीलमताई गो-हे यांनी देहविक्रय करणा-या महिलांची कैफियत ऐकून घेऊन महानगरपालिका प्रशासनास सूचना केल्यानंतर प्रशासनामार्फत तात्काळ 250 लस उपलब्ध करुन देण्यात आल्या. या लसीकरणासाठी सिंहगर्जना प्रतिष्ठानतर्फे राजेंद्र शिंदे आणि आश्विनी शिंदे यांनी अथक प्रयत्न केले. लसीकरणावेळी डॉ. गो-हे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे देवदासींशी संवाद साधला.

बुधवार पेठेत राहणाऱ्या या महिलांची संख्या जवळपास 3500 हजार हून जास्त आहे. काही महिला कामानिमित्ताने येथे येतात तर काही जण इथेच राहतात. पण धक्कादायक बाब म्हणजे या महिलांमध्ये जवळपास 50 टक्के महिलांकडे आधारकार्ड, पॅनकार्डच नाही. लसीकरणासाठी याबाबी आवश्यक असल्याने यांचे लसीकरण करायचे कसे असा प्रश्न आमच्या समोर आहे. प्रशासनाने काहीतरी मार्ग काढावा आणि या महिलांचे लसीकरण करावे. कारण दिवसभरात वेगवेगळ्या लोकांना या महिला भेटत असतात आणि त्यामुळे कोरोना वाढू नये म्हणून या महिलांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. असे मत यावेळी शिवसेनेचे शहर संघटक व सिंहगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: