पोवाड्यातून सांगितली शिवरायांची महती

पुणे : चैतन्याची थाप डफावर लागे शाहिरी गर्जाया…दरीदरीतून उठे मावळा हक्क आपला प्रस्ताया…निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी  जाणता राजा…या शब्दात बुलंद आवाजातील पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगण्यात आली.

दि इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स पुणे यांच्या वतीने पोवाडा – महाराष्ट्राची लोककला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने शाहीरी चौरंग हा पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात शाहीर हेमंतराजे मावळे आणि सहका-यांनी पोवाड्याचे सादरीकरण केले. दि इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे सदस्य शाहीर गणेशदादा टोकेकर यांचे कार्यक्रम करण्यास सहकार्य मिळाले.

शाहिरी ही प्राचीन कला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या कलेला राजाश्रय आणि महत्त्व मिळवून दिले. शाहिरी कार्यक्रमाचे गण, मुजरा आणि पोवाडा असे सादरीकरण केले जाते. शाहीरीची ऐतिहासिक पंरपरा देखील यावेळी सांगण्यात आली.

प्रा. संगिता मावळे, शाहीर महादेव जाधव, अमित पवळे, सविता वाडेकर, अरुणकुमार बाभूळगावकर, अक्षदा इनामदार (गायन), होनराज मावळे (हार्मोनियम), मुकुंद कोंडे (ढोलकी) यांनी साथसंगत केली. अक्षदा इनामदार आणि होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: