राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने उच्चशिक्षित स्वप्नील लोणकरचा बळी घेतला -सिद्धेश्वर लटपटे
पुणे : पुणे विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ् या व स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे केंद्र असलेले शहर काल स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराच्या आत्महत्येने हादरले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी ) वतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने वयाच्या २४ व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली. स्वप्नीलच्या मृत्यूला राज्य शासनच पूर्णतः जबाबदार आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने उच्चशिक्षित स्वप्नीलचा बळी घेतला, असे मत अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी व्यक्त केले आहे.
एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा अंत झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. काही महिन्यापूर्वीच एमपीएससीच्या विषयाला घेऊन पुण्यासह संपूर्ण राज्यात आंदोलन झाले. परंतु या आंदोलनानंतर देखील राज्य शासनाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांबाबत गंभीर नाही हे या घटनेवरून लक्षात येते.
अभाविप स्वप्नील लोणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते व त्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करते. स्वप्नील लोणकर सारखी वेळ अन्य उमेदवारांवर येऊ नये यासाठी शासनाने त्वरित अन्य उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना नोकरीवर रुजू करावे असे देखील लटपटे म्हणाले.
