रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या प्रांतपालपदी पंकज शाह यांची नियुक्ती

पुणे : रोटेरियन पंकज शाह यांची रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या प्रांतपालपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. आगामी २०२१-२२ या वर्षाकरीता रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३१३१ चे प्रांतपाल म्हणून ते पुणे, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा व रायगड जिल्हा या अंतर्गत येणा-या सर्व रोटरी क्लबचे प्रमुख म्हणून कार्यरत असतील.

पंकज शाह यांनी प्रोडक्शन टेक्नॉलॉजी या विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. शिरवळ, चाकण बरोबरच मध्य प्रदेशातील इंदौर येथे असलेल्या विविध ९ कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक म्हणून शाह सध्या कार्यरत आहेत. २००९ पासून रोटेरियन म्हणून सामाजिक कार्यात ते सक्रीय असून रोटरी क्लब ऑफ सारसबागचे अध्यक्ष म्हणून २०१३- १४ साली त्यांनी काम केले आहे. प्रशासकीय काम व प्रशासनावरील पकड, संकटकाळातील व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण कल्पना या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

आपल्या नियुक्ती विषयी बोलताना पंकज शाह म्हणाले, “रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३१३१ चा प्रांतपाल म्हणून जबाबदारी स्वीकारत असताना मला आनंदा बरोबरच जबाबदारीची जाणीवही आहे. माझ्या प्रांतपाल पदाच्या कार्यकाळात ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील प्राथमिक शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छता व पर्यावरण, पाणी व वीज वापर आदी क्षेत्रांवर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेऊन गावांचा सर्वांगीण विकास करण्यावर आमचा भर असेल. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने शाळेतील सोयी सुविधांबरोबरच डिजिटल शिक्षण, ई- लर्निंग प्रारूप या कार्यक्रमांवर आम्ही काम करणार आहोत. शहरी भागात कचरा व्यवस्थापन व वाहतूक समस्येवर उपाय शोधण्याचा व ते राबविण्याचा आमचा मानस आहे. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत. रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ मधील शहरे व गावांना राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ शहर, स्वच्छ गावांचा दर्जा मिळावा यासाठी देखील आम्ही कार्यरत असू.”

पंकज शाह यांना अमेरिकेतील दि रोटरी फाउंडेशनच्या सर्वोत्तम समजल्या जाणा-या ‘सायटेशन फॉर मेरिटोरिअस सर्व्हिस’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. २०१३- १४ दरम्यान डिस्ट्रीक्ट ३१३१ मधील सर्वोत्तम अध्यक्ष म्हणून त्यांनी पारितोषिक पटकाविले असून रोटरी इंटरनॅशनलचा मानाचा क्लब बिल्डर पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. आजवर रोटरीच्या अनेक स्तरावर त्यांनी यशस्वीपणे काम केलेले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: