Pune – धानोरीत तयार झाली बेकायदेशीर भाजी मंडई ; व्यवसायिकाकांकडून डिपॉझिट सह दरमहा “हप्ता वसुली”

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, महापालिका आयुक्तांकडे कारवाईची मागणी

पुणे – धानोरी येथील गोकुळ नगर मधील रिकाम्या सुमारे ४० गुंठे जागेवर बेकायदेशीर रित्या स्टॉल व भाजी मंडई सुरू करण्यात आली आहे. या भाजी मंडई मधून भाजी विक्रेत्यांकडून स्थानिक नागरिक दरमहा जागेचे भाडे आकारत आहेत. त्यामुळे सदर जागेवरील बेकायदेशीर स्टॉल व भाजी मंडई वर कारवाई करावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष राजू ठोंबरे यांनी केली आहे.

धानोरीतील रस्ता रुंदीकरणात सुमारे ४० गुंठे जागा शिल्लक राहिली आहे. ही जागा आता जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात आहे. या जागेवर सुरवातीला हळू हळू स्टॉल उभारले. स्टॉल उभारून अनेकांनी भाड्याने दिले आहेत. डिपॉझिट साठी ठराविक रक्कम घेऊन व्यवसाय करण्यासाठी दरमहा ठराविक शुल्क आकारण्यात येत आहेत. मागील काही वर्षांपासून बिनदिक्कतपणे हा मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू आहे. या सर्व प्रकाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या अनधिकृत भाजीमंडई ला अप्रत्यक्ष यांचेच “पाठबळ” असल्याचे बोलले जाते.

उर्वरित शिल्लक जागेत भाजी मंडई करिता तात्पुरते गाळे करून दिले आहेत. या जागेचे भाडे भाजी विक्रते यांच्याकडून स्थानिक नागरिक वसूल करत असल्याची चर्चा आहे. या भाजी मंडई ची नोंद महापालिकेकडे नाही, याशिवाय महापालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी राजमाता जिजाऊ भाजी मंडई बांधली आहे. मात्र त्याठिकाणी व्यवसायिक न जाता याच ठिकाणी व्यवसाय होतो म्हणून बसतात. मात्र याचाच फायदा घेत त्यांना स्थानिक नागरिकांनी त्यांना रिकाम्या जागेत बसवून भाडे आकारणी करत असल्याचे भाजी विक्रेते यांनी सांगितले. त्यामुळे सदर जागा अतिक्रमण मुक्त करावी व या जागी महापालिकेचे हॉस्पिटल किंवा महापालिकेची अधिकृत भाजी मंडई व्हावी अशी मागणी आयुक्तांकडे राजू ठोंबरे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. राजू ठोंबरे म्हणाले, शासनाकडे असलेली सदर जागा महापालिकेने तातडीने हस्तांतरित करून घ्यावी. सध्या या जागेवर उभारलेले अनाधिकृत स्टॉल व बेकायदेशीर भाजी मंडई वर करवाई करून सदर जागा रिकामी करावी, रिकाम्या जागेत हॉस्पिटल व महापालिकेची अधिकृत भाजी मंडई बांधावी अशी आपण आयुक्तांकडे मागणी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: