पडद्यामागील कलाकार संघटित झाल्यास प्रश्न सोडविणे सहज शक्य – अभय छाजेड

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाणे आवश्यक आहे. पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञ संघटित झाले तर त्यांचे प्रश्न सोडविणे सोपे जाईल. संघटनेच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन कलागौरव, पुणे या संस्थेचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी केले.

बालगंधर्व रंगमंदिराच्या 54व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला संवाद पुणे आणि कलागौरव पुणे या संस्थांच्या माध्यमातून पडद्यामागील (बॅकस्टेज) कलाकार व तंत्रज्ञांच्या मुलांना क्रमिक पुस्तकांचे वाटप छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी कलाकार-तंत्रज्ञांना मौलिक सूचना केल्या. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले, उपाध्यक्ष अरुण पोमण, तसेच वृद्ध कलावंत कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कोठावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्य विषयक महापालिका, महात्मा फुले, शहरी गरीब योजनांची माहिती या वेळी छाजेड यांनी दिली. सरकारी योजना समजून घेतल्यास या योजनांचा नक्कीच लाभ करून घेता येईल. प्रत्येकाने लसीकरण करून घेतल्यास कोरानाविरुद्धची लढाई लवकरात लवकर जिंकता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
नाट्यगृहांचा वाढदिवस फक्त पुण्यात साजरा केला जाण्याची परंपरा आहे, बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली असल्याचे सांगून सुनील महाजन प्रास्ताविकात म्हणाले, पडद्यामागील कलाकारांना विविध संस्थांच्या सहकार्याने गेल्या दिड वर्षापासून मदतीचा हात दिला जात आहे. जवळपास 200 कलाकारांचा आरोग्य विमा उतरविण्यात आला आहे. पालकांचे कष्ट समजून घेऊन विद्यार्थ्यांनी मेहनतीने यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते बालगंधर्व यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला. रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले यांनी मनोगत व्यक्त केले. निकिता मोघे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: